Vaishnavi Hagawane Death Case : हगवणे जेसीबी विक्री फसवणूक प्रकरण; शशांकच्या मित्राला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 21:30 IST2025-06-06T21:30:02+5:302025-06-06T21:30:31+5:30
हगवणे माय-लेक आणि साठेसह एकूण सहा जणांना एक दिवसाची पोलिस कोठडी

Vaishnavi Hagawane Death Case : हगवणे जेसीबी विक्री फसवणूक प्रकरण; शशांकच्या मित्राला बेड्या
चाकण (जि. पुणे) : महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात शशांक हगवणे व लता हगवणे यांच्या विरोधातील जेसीबी विक्री गैरव्यवहार प्रकरणाच्या गुन्ह्याच्या तपासात अटक केलेल्या तीन तोतया बँक वसुली एजंटांनी जेसीबी शशांक हगवणे याच्या ताब्यात देण्यासाठी शशांकचा मित्र प्रणय साठे या रिकव्हरी एजंटने मध्यस्थी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
प्रणय तुकाराम साठे (वय २७, रा. कोथरूड, पुणे) याला शुक्रवारी (दि. ६) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. जेसीबी गैरव्यवहाराच्या मांडवलीसाठी शशांकने त्याचा चालक देवानंद कोळी याच्या मार्फत गुगल पेद्वारे ३० हजार रुपये प्रणय साठे यास दिले असून ती रक्कम प्रणय याने गुगल पेद्वारे अटक आरोपी गणेश पोतले याला दिली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आमचा भाडेतत्त्वावर व्यवहार असल्याचे सांगितले होते, मात्र हा खरेदी व्यवहार आहे हे नोटरीमुळे सिद्ध झाले आहे. प्रणयने मध्यस्थी केल्याने अटकेतील बँक एजंटने जेसीबी जप्त केलाय, नोटरी करारनाम्यातील अटी व शर्तींचा काय उल्लेख केलाय हे पाहावे लागेल. नोटरी करार हस्तगत करायचा आहे, त्यासाठी हगवणे आणि साठे आरोपींना पुन्हा पोलिस कस्टडी मिळावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
टीटी फॉर्मवर सह्या नाही, फक्त नोटरी झालं म्हणजे हा व्यवहार झाला असे सिद्ध होत नाही. आरोपीवर फक्त पत्नीच्या बाबतचा गुन्हा आहे, इतर साधी कुठे NC दाखल नाही. हगवणे यांचा १८ महिने जेसीबी वापरला आहे. ते भाडे द्यायचे नाही म्हणून हा बनाव केला जात आहे. बँकेचे लोन असल्याने जेसीबी ट्रान्स्फर कसा होणार ? यामध्ये बँकेचा एक रुपयाचा लॉस नाही. फिर्यादीने दिलेल्या ११ लाख ७० हजारांपेक्षा जेसीबीचे भाडे जास्त होते आहे, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला.
जेसीबी फसवणूक प्रकरणांमध्ये हगवणे माय-लेकासह शशांकचा मित्र प्रणय साठे आणि ३ एजंट अशा एकूण सहा जणांची उद्या कोर्टात एकत्रित सुनावणी होणार असून आजच्या सुनावणीमध्ये हगवणे माय-लेकासह प्रणय साठे अशा तिघांना एक दिवसाची पोलिस कस्टडी राजगुरूनगर न्यायालयाने सुनावली आहे.
लता हगवणे यांना आली भुरळ
राजगुरूनगर न्यायालयात जेसीबी फसवणूक प्रकरणात सुनावणी सुरू असताना, लता हगवणे यांना भोवळ आल्याचा प्रकार घडल्याने त्यांना खुर्ची बसायला देण्यात आली होती.