आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 10:04 AM2023-08-23T10:04:10+5:302023-08-23T10:05:55+5:30

आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

Use water sparingly from now on, says Chief Minister Eknath Shinde | आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

googlenewsNext

पुणे : राज्यात पाऊसमान कमी झाल्याने काही जिल्ह्यांत खरीप पिकांची स्थिती बिकट झाली असून येत्या महिनाभरात पाऊस न आल्यास दृष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागवार आढावा घेतला. त्यात पुणे विभागातील पाऊस, पाणीसाठा, चाराटंचाई यांचा आढावा घेण्यात आला. विभागातील सोलापूर जिल्ह्यात सर्वांत बिकट स्थिती असून, पाणीसाठा केवळ १३ टक्के आहे. तर पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा ९२ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. त्यामुळे सध्या पुणे शहरावर पाण्याचे संकट नाही. तरीही आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

राज्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मंगळवारी (दि. २२) बैठक घेतली. यावेळी राव यांनी विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यांतील पावसाची स्थिती, धरणातील साठ्याची माहिती दिली. राज्यात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतचे गांभीर्य ओळखून टंचाईसदृश परिस्थिती आणि स्थानिक परिस्थितीनुसार त्या-त्या शहरांसह जिल्ह्यांमध्ये विभागीय आयुक्तांनी निर्णय घ्यावेत; तसेच शहरात पिण्याचे पाणी वापरताना शक्यतो शहरातील नागरिकांनी काटकसरीने वापरावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील स्थिती यंदा बिकट आहे. गेल्यावर्षी उजनी धरणात ९९ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो १३ टक्केच आहे. पुढील महिनाअखेर पाऊस झाल्यास परिस्थितीत सुधारणार होईल. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरताना जलसंपदा विभागाशी समन्वय साधून त्याचे नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे राव यांनी सांगितले. वनविभागाबरोबर ग्रामीण भागात ज्या ठिकाणी चारा उपलब्ध आहे त्याचा आढावा घेऊन चारा टंचाई होणार नाही; तसेच चाऱ्याअभावी पशुधन संकटात येणार नाही, याची दक्षता घेण्याचाही त्यांनी यावेळी दिल्या. पुणे विभागात सध्या १५५ टँकर सुरू आहेत. त्यापैकी ४० टँकर पुणे जिल्ह्यात सुरू आहेत. अशीच स्थिती कायम राहिल्यास टँकरची संख्या वाढवावी लागेल. त्यासाठी पुरेसे सरकारी आणि खासगी टँकर उपलब्ध करण्याचे नियोजन करावे लागेल, असेही राव यांनी सांगितले. पाणीटंचाईसदृश स्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान योग्य ती पावले उचलण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. स्थानिक परिस्थिती पाहून हा आराखडा तयार करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Use water sparingly from now on, says Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.