पुण्यात UPSC करणाऱ्या तरुणीचा विनयभंग: क्लासेस घेणाऱ्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 10:24 IST2023-11-24T10:23:16+5:302023-11-24T10:24:09+5:30
पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात ही घटना घडली...

पुण्यात UPSC करणाऱ्या तरुणीचा विनयभंग: क्लासेस घेणाऱ्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल
- किरण शिंदे
यूपीएससी आणि एफवाय बीकॉमच्या क्लाससाठी एका शिक्षकाच्या घरी जाणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचा त्याच शिक्षकाने विनयभंग केला. पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात ही घटना घडली. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अमित सिरमनवर (वय 28, रा. मिटकॉन कॉलेजच्या मागे बालेवाडी पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. 19 वर्षीय पीडित तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. जून 2023 ते 18 नोव्हेंबर 2023 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी यूपीएससी आणि एफ वाय बी कॉमच्या क्लाससाठी आरोपीकडे जात होती. दरम्यान क्लास घेत असताना आरोपीने फिर्यादीला घरातील कामे करायला लावून काम न केल्यास प्लास्टिकच्या छडीने फिर्यादीला मारहाण केली.
तसेच अश्लील भाषेत बोलत संबंधित शिक्षकाने वारंवार विनयभंग केल्याचे फिर्यादी तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादी तरुणीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.