कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 16:11 IST2025-07-22T16:11:34+5:302025-07-22T16:11:47+5:30
दोघे एकमेकांचे एक वर्षापासून मित्र असल्याचे तपासादरम्यान समोर आलेले आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनाही तिने आपल्या तोंडावर स्प्रे मारल्याचे खोटे सांगितले.

कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
पुणे : कुरिअरबॉय म्हणून घरी आलेल्या तरुणाने स्प्रे मारून बेशुद्ध केले. त्यानंतर बेशुद्धावस्थेत अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला होता. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली; परंतु पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात हा सर्व बनाव तरुणीनेच घडवून आणल्याचे समोर आले होते. घरी आलेली व्यक्ती कुरिअरबॉय नसून, त्या तरुणीचाच मित्र होता. हे पोलिस तपासात समोर आले. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी खोटी माहिती देणे, बनावट पुरावे तयार करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी ‘त्या’ तरुणीवर अदलखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
तिने हा सर्व प्रकार का केला, हे मात्र ती सांगत नसल्याने न्यायालयाच्या परवानगीने या गुन्ह्याचा तपास करून तिने हा सर्व प्रकार का केला? याचा शोध घेतला जाणार आहे. २ जुलै रोजी कोंढवा परिसरात सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडल्याचे तरुणीने सांगितले होते.
पोलिसांनी तिच्या मोबाईलमधील मेसेजेस, व्हॉटस्ॲपची तपासणी केली असता. तरुणीने स्वत:च व्हॉट्सॲपद्वारे त्याला घरी बोलावल्याचे समोर आले. १ जुलै रोजी केलेल्या व्हॉटसॲप चॅटप्रमाणे फिर्यादीने आरोपीला घरी कोणी नसताना जादा कपडे घेऊन येण्याबाबत सुचवले होते. तसेच येण्याच्या मार्गाबाबत ‘पूर्वीप्रमाणेच ये’ असेही सुचवले आहे. त्यावरून आरोपी हा कुरिअर बॉय नसून तो फिर्यादीचा मित्र असल्याचे निष्पन्न झाले.
दोघे एकमेकांचे एक वर्षापासून मित्र असल्याचे तपासादरम्यान समोर आलेले आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनाही तिने आपल्या तोंडावर स्प्रे मारल्याचे खोटे सांगितले. फिर्यादी हिने घटना घडल्यानंतर रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी शुद्धीवर आल्यावर स्वत:चा फोन हातात घेऊन पाहिला असे तक्रारीत नमूद केले. प्रत्यक्षात अर्धनग्न अवस्थेतील फोटो आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलवरून तिच्या संमतीने २ जुलैला रात्री ७ वाजून ५३ मिनिटांनी काढलेले होते. आरोपी हा सोसायटीच्या लिफ्टमधून ग्राऊंड फ्लोअरला येऊन मेनगेटमधून ८ वाजून २७ मिनिटांनी बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले. तसेच, फिर्यादीच्या फोनवरून काढण्यात आलेला फोटो हा ८ वाजून २७ मिनिटे आणि ५३ सेकंदांनी एडिट करून त्यावर मेसेज टाईप केलेला आहे. हा मेसेज फिर्यादीने स्वत:च टाईप केला असल्याचे देखील निष्पन्न झाले. या घटनेनंतर अंदाजे ५०० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना तपासासाठी वेगवेगळ्या पथकामध्ये सहभागी करून शहरातील २५० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या महिलेने केलेले गैरकृत्य हे तिने हेतुपुरस्सर व जाणीवपूर्वक केल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले. त्यामुळे कोंढवा पोलिसांनी खोटी माहिती देणे, खोटे पुरावे तयार करणे, त्याचा वापर करून पोलिसांना अधिकाराचा गैरवापर करण्यास प्रवृत्त करणे अशा विविध कलमांन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
पोलिसांची दिशाभूल करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी या तरुणीविरोधात पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर पुढील तपास करण्यात येणार आहे. - डॉ. राजकुमार शिंदे, पोलिस उपायुक्त.