अवकाळी पावसाने पिंपरी चिंचवडकरांची उडवली दाणादाण
By विश्वास मोरे | Updated: January 9, 2024 15:08 IST2024-01-09T15:06:11+5:302024-01-09T15:08:04+5:30
पावसाचा जोर कमी असला तरी वातावरणामध्ये गारठा जाणवत आहे

अवकाळी पावसाने पिंपरी चिंचवडकरांची उडवली दाणादाण
पिंपरी: पिंपरी चिंचवड परिसरामध्ये गेल्या दोन तासांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या पावसाने सामान्य नागरिकांची दाणादाण उडवली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहे. थंडी काहीशी कमी झाली आहे. सोमवारी सायंकाळी काही प्रमाणात आभाळ भरून आले होते. मात्र, पाऊस आला नाही. सकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. मंगळवारी सकाळी चिंचवड परिसरामध्ये हलक्याशा सरीवर बरसल्या. त्यानंतर काही काळ पावसाने उघडीप दिली. पुन्हा दुपारी साडेबारा नंतर पाऊस पडायला सुरुवात झाली. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, चिंचवड, पिंपरी, निगडी, थेरगाव, किवले, रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, सांगवी,नवी सांगवी, दापोडी, वाल्हेकर वाडी आकुर्डी या परिसरात दुपारी साडेबारा वाजल्यापासून पाऊस पडत आहे.
वातावरणात वाढला गारठा
पावसाचा जोर कमी असला तरी वातावरणामध्ये गारठा जाणवत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे दुपारच्या वेळेस सुटणाऱ्या शाळकरी मुलांची गैरसोय झाली. अचानक आलेल्या पावसामुळे कामाला जाणाऱ्या तसेच कामावरून घरी परतणाऱ्या कामगार वर्गाची गैरसोय झाली. पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये सध्या पावसाच्या सरी बरसत आहेत.