आईशी जोडला अनोखा ‘लिव्हर’पूल

By Admin | Updated: July 2, 2014 01:50 IST2014-07-02T01:50:35+5:302014-07-02T01:50:35+5:30

वात्सल्यसिंधू आई, प्रेमस्वरूप आई’चे वात्सल्य लाभावे, यासाठी एका मुलाने आईसाठी आपल्या यकृताचे दान केले. यकृत निकामी झाल्याने मृत्यूशी झुंज देणाऱ्या आईचे प्राण वाचविले

Unique 'Liverpool' connected to the mother | आईशी जोडला अनोखा ‘लिव्हर’पूल

आईशी जोडला अनोखा ‘लिव्हर’पूल

पुणे : ‘वात्सल्यसिंधू आई, प्रेमस्वरूप आई’चे वात्सल्य लाभावे, यासाठी एका मुलाने आईसाठी आपल्या यकृताचे दान केले. यकृत निकामी झाल्याने मृत्यूशी झुंज देणाऱ्या आईचे प्राण वाचविले. पुण्यातील ग्लोबल रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. उपचारानंतर दोघांचीही प्रकृती उत्तम असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
ग्लोबल रुग्णालयातील यकृत तज्ज्ञ डॉ. मोहंमद रेला, डॉ. हेमंत वडेयार, समीर शाह यांनी अथक प्रयत्नातून ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. डॉ. वडेयार म्हणाले, की ४९ वर्षांच्या गुणवंती गुंदेशा यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्यांचे यकृत निकामी झाल्याचे दिसून आले. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर पडत
होता. त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. तातडीने यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचे होते. त्यासाठी यकृत हवे असल्याचे डॉक्टरांनी त्यांच्या घरच्यांना सांगितले. ते ऐकताच गुंदेशा यांची धवल आणि धीरज ही दोन्ही मुले यकृत दान करण्यासाठी पुढे आली. डॉक्टरांनी तातडीने दोघांच्या तपासण्या करून कोणाचे यकृत मॅच होत आहे, हे पाहिले.
यामध्ये गुंदेशा यांचा लहान मुलगा धीरज याचे यकृत मॅच होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याने तातडीने यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. लगेचच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुरू केल्या. तब्बल १२ तास शस्त्रक्रिया करून धीरजचे अर्धे यकृत काढले आणि गुंदेशा यांचे खराब झालेले यकृत काढून त्याठिकाणी धीरजच्या यकृताचे प्रत्यारोपण केले. गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वीरीत्या पार पाडली. (प्रतिनिधी)

Web Title: Unique 'Liverpool' connected to the mother