केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी पुण्यात; मदनदास देवी यांच्या अंत्यसंस्काराला राहणार उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 13:32 IST2023-07-24T13:31:35+5:302023-07-24T13:32:13+5:30
मदनदास देवी यांनी आपलं जीवन राष्ट्रसेवेसाठी आणि संघ कार्यासाठी व्यतीत केलं

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी पुण्यात; मदनदास देवी यांच्या अंत्यसंस्काराला राहणार उपस्थित
पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटनमंत्री मदन दास देवी यांचे बंगळुरूमध्ये आज पहाटे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते प्रकृती अस्वस्थतेमुळे घरीच होते. तर, वर्षभरापूर्वी त्यांच्यावर हरीद्वार येथील पालमपूरच्या आयुर्वेद संस्थेत पंचकर्म आणि इतर थेरपीद्वारे उपचारही करण्यात आले होते. दरम्यान, उद्या २५ जुलै रोजी सकाळी पुण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे. देवी यांचा अंत्यविधी पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत होणार असून त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तसेच पूर्व सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर अंत्यविधीसाठी उपस्थित असणार आहेत. मंगळवारी सकाळी 9 ते 11 दरम्यान मदनदास देवी यांचं पार्थिव मोतीबाग संघ कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
लहानपणापासूनच मदनदास देवी यांनी आपलं जीवन राष्ट्रसेवेसाठी आणि संघ कार्यासाठी व्यतीत केलं. तर जवळपास आयुष्यातील ७० वर्षे त्यांनी संघाच्या प्रचार आणि प्रसारासाठी काम केलं. संघाकडून ते भाजपचे राजकीय निरीक्षक म्हणूनही कार्यरत होते.