दुर्दैवी घटना! शिरूरमध्ये आठ वर्षीय विद्यार्थ्याला कुत्र्याचा चावा; उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 17:34 IST2023-04-05T17:28:47+5:302023-04-05T17:34:15+5:30
पवनला काही दिवसांपूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता...

दुर्दैवी घटना! शिरूरमध्ये आठ वर्षीय विद्यार्थ्याला कुत्र्याचा चावा; उपचारादरम्यान मृत्यू
शिरुर (पुणे) : शिरूर (जोशीवाडी ) येथील महादेवनगर येथे राहत असलेल्या पवन स्वप्नील यादव (वय ८) या विद्यार्थ्याला कुत्राने चावा घेतला व त्यात तो मृत्युमुखी पडला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महादेवनगर येथे राहणाऱ्या स्वप्नील यादव यांच्या मुलगा पवन हा रविवारी अत्यवस्थ झाल्याने त्याला उपचारासाठी पुणे येथील नायडू दवाखान्यात नेण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्याचे सोमवारी ३ एप्रिलला निधन झाले. पवन याला काही दिवसांपूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता.
पवन शहरातील आरएमडी प्रशालेत इयत्ता दुसरीत शिकत होता. शहरातील प्रसिध्द डॉ . कै. आर. डी. यादव यांच्या तो नातू होता. पवनच्या आकस्मिक निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अंत्यत शोकाकुल वातावरणात पवन यांचा अंत्यविधी शिरुर येथे झाला.
दरम्यान, मागील काही वर्षापासून शिरुर शहरात भटक्या व मोकाट कुत्र्याचा प्रश्न गंभीर झाला असून शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दुचाकीस्वार व महिला हे मोकाट कुत्र्यांचा त्रासाने त्रस्त आहेत. भटक्या कुत्र्याचा संख्येवर नियंत्रण आणण्याबरोबरच त्याचे निर्बिजीकरण करणे, मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याबाबत सातत्याने मागणी करून ही याबाबत फारसे काही होत नसल्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे. पवन यांच्या मृत्यू कुत्र्याने चावा घेतल्यामुळे झाल्याने शहर परिसरातील भटक्या व मोकाट कुत्र्याच्या बंदोबस्ताचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कुत्र्याने अथवा मांजराने चावा घेतला अथवा ओरखल्यावर तातडीने या संदर्भातील रेबीज प्रतिबंधक लस घ्यावी. लस घेण्याबाबत चाल ढकलपणा करू नये. सरकारी दवाखान्यात ही लस मोफत उपलब्ध असते, असे डॉ. घावटे यांनी सांगितले. त्याचबरोबर शिरुर शहरात वाढत असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या वावराबद्दल चिंता व्यक्त करून यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ही केली.
- डॉ. विक्रम घावटे ( बालरोगतज्ञ )