Cyber Crime: पुण्यात ‘टाटा मोटर्स’ च्या नावाने बेरोजगार युवकांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 18:57 IST2021-11-01T18:57:13+5:302021-11-01T18:57:20+5:30
पंधरा युवकांची फसवणूक झाली असून त्याबाबत सायबर क्राइमकडे तक्रार करण्यात आली आहे.

Cyber Crime: पुण्यात ‘टाटा मोटर्स’ च्या नावाने बेरोजगार युवकांची फसवणूक
पुणे : टाटा मोटर्समध्ये (Tata Motors) नोकरी लावतो असे सांगून काही जणांनी मुरूडमधील एका युवकास पुण्यामध्ये फसवले. ग्राहक पंचायतीकडे तक्रार आल्यावर त्यांनी थेट टाटा मोटर्सबरोबर संपर्क साधला त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याचपद्धतीने १५ युवकांची फसवणूक झाली असून त्याबाबत सायबर क्राइमकडे (Cyber Crime) तक्रार करण्यात आली आहे.
ग्राहक पंचायतीचे (Grahak Panchayat) पदाधिकारी विलास लेले यांनी ही माहिती दिली. मुरूडहून पुण्यात आलेल्या एका युवकाला टाटा मोटर्समध्ये स्टोअर किपरची नोकरी असल्याचा फोन आला. त्यासाठी अर्जाचे १५०० रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर परीक्षा शुल्क, प्रशिक्षण शुल्क अशा वेगवेगळ्या कारणाने त्याच्याकडून एक-दोन वेळा नव्हे तर तब्बल ९ वेळा पैसे वसूल करण्यात आले. अखेरीस कंटाळून त्याने तक्रार करण्याची धमकी दिल्यावर त्याला टाटा मोटर्सच्या प्रवेशद्वारावर भेटण्यास बोलावले गेले. तिथे कंपनी तुला लॅपटॉप देणार आहे, असे सांगून पुन्हा पैसे घेण्यात आले व भेटायला बोलावणारा गायब झाला.
संबंधित युवकाच्या आत्याने त्याला पंचायतीकडे तक्रार करण्यास सांगितले, अशी माहिती लेले यांनी दिली. तक्रार आल्यावर लेले यांनी थेट टाटा मोटर्सच्या व्यवस्थापकांबरोबर संपर्क साधला, त्यावेळी त्यांनी नोकरीसाठी म्हणून कोणतीही जाहिरात दिली नाही, असे सांगितले. तसेच रोज काही युवक यासंबंधी विचारणा करण्यासाठी येत असल्याने त्यांना प्रवेश नाकारून कंपनीच्या संकेतस्थळावर नोकरी नाही, असे निवेदनही प्रसिद्ध केल्याची माहिती देण्यात आली.
सावधगिरी बाळगावी
लेले म्हणाले, युवकांनी नोकरीसाठी प्रयत्न करताना कोणी आपल्याला फसवत तर नाही ना याची सावधगिरी बाळगावी. १५ जणांकडून या प्रकारे पैसे घेण्यात आले. त्या युवकाला आलेले फोन कॉल, मोबाइल क्रमांक, ज्या खात्यात पैसे जमा झाले तो खाते क्रमांक, कंपनीच्या प्रवेशद्वारावर भेटलेल्या व्यक्तीचा नंबर व चेहरेपट्टी अशी सर्व माहिती सायबर गुन्हे शाखेला देऊन रीतसर तक्रार करण्यात आली आहे. त्याचा तपास सुरू आहे.