Child Abuse: नऊ वर्षाच्या अनाथ पुतणीवर नराधम काकाच करत होता लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 14:42 IST2021-11-28T14:42:01+5:302021-11-28T14:42:09+5:30
मुलीने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या एका महिलेला सांगितली

Child Abuse: नऊ वर्षाच्या अनाथ पुतणीवर नराधम काकाच करत होता लैंगिक अत्याचार
पुणे : आई वडिलांचा मृत्यु झाल्यानंतर भावा बहिणीचा सांभाळ करणारा काकाच आपल्या ९ वर्षाच्या पुतणीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी वडगावमधील चरवड वस्ती येथे राहणाऱ्या ४९ वर्षाच्या काकाला अटक केली आहे. हा प्रकार १३ डिसेबर २०१८ पासून २५ नोव्हेबर २०२१ या कालावधीत घडत होता. पिडित मुलीने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती त्यांच्याच इमारतीत राहणाऱ्या एका महिलेला सांगितली. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांचा ८ वर्षांपूर्वी मृत्यु झाला आहे. त्यानंतर मुलगी, तिचा १२ वर्षांचा भाऊ व आई हे काकासह एकत्र राहतात. वडिलांच्या मृत्युनंतर काही वर्षांनी काकीचा मृत्यु झाला. दोन वर्षापूर्वी मुलीच्या आईचा मृत्यु झाला. त्यामुळे ९ वर्षाची ही मुलगी व तिच्या भावाचा काका सांभाळ करीत आहे. हे तिघेच घरात एकत्र राहतात. काकाने १३ डिसेबर २०१८ रोजी या मुलीवर प्रथम लैगिक अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या भावाला मारुन टाकील, अशी धमकी दिली. तसेच तिच्या भावालाही धमकी दिली.
त्यामुळे घाबरलेल्या या मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. त्यानंतर तो तिच्यावर वारंवार अत्याचार करु लागला. २५ नोव्हेंबर रोजी या प्रकाराचा मुलीला खूप त्रास होऊ लागला. तेव्हा ती रडत शेजारी राहणाऱ्या महिलेकडे गेली. तिला त्रास होत असल्याचे सांगितले. तेव्हा या महिलेने तिला विश्वासात घेऊन विचारले. तेव्हा आई गेल्यापासून काका आपल्याशी वाईट वागत असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर या महिलेने मुलीला घेऊन सिंहगड रोड पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी काकाला अटक केली आहे. या घटनेत ही दोन्ही मुले आता पुन्हा अनाथ झाली आहेत. पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे अधिक तपास करीत आहेत