उदय सामंत हल्ला प्रकरण! पुण्यातील शिवसेनेच्या शहरप्रमुखासह ६ पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 13:10 IST2022-08-12T13:10:14+5:302022-08-12T13:10:21+5:30
राजकीय हेतूने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला

उदय सामंत हल्ला प्रकरण! पुण्यातील शिवसेनेच्या शहरप्रमुखासह ६ पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर
पुणे : मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेनेच्या शहरप्रमुखासह सहा पदाधिकाऱ्यांना न्यायालयाने ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर गुरुवारी जामीन मंजूर केला. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, शहर समन्वयक ॲड. संभाजी थोरवे, कसबा विभागप्रमुख चंदन साळुंके, युवासेनेचे राजेश पळसकर, पर्वती विभागप्रमुख सूरज लोखंडे आणि हिंगोलीचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, अशी जामीन अर्ज मंजूर केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांना तपासात सहकार्य करावे, साक्षीदारांवर दबाव टाकू नये, पोलिसांच्या पूर्व परवानगीशिवाय जिल्ह्याबाहेर जाता येणार नाही, अशीही सूचना न्यायालयाने केली.
सामंत यांच्या वाहनावर २ ऑगस्ट रोजी कात्रज चौकात जमावाने हल्ला केला होता. याबाबत सामंत यांच्या वाहन चालकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या या सहा पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या या सहा जणांनी ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. अतुल पाटील यांच्यामार्फत जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. सहा जणांपैकी कोणीही घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यांच्याकडून कोणतीही जप्ती करण्यात आलेली नाही, त्यांच्याकडे कोणताही तपास करणे बाकी नाही, तसेच राजकीय हेतूने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने सहा जणांना जामीन मंजूर केला.