क्लासला जात असताना काळानं गाठलं..! कंटेनरने चिरडून दोन तरुणांचा मृत्यू, चाकण येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 10:19 IST2025-05-31T10:18:51+5:302025-05-31T10:19:54+5:30
कंटेनरचालकाला गाडी थांबवण्यासाठी आवाज दिला; परंतु तो थांबत नसल्याने आजूबाजूच्या लोकांनी आवाज देऊन कंटेनर चालकास थांबवले.

क्लासला जात असताना काळानं गाठलं..! कंटेनरने चिरडून दोन तरुणांचा मृत्यू, चाकण येथील घटना
चाकण : भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर चालकाने ओव्हरटेक करताना दुचाकीस जोराचा धक्का दिल्याने दुचाकीवरील दोन युवकांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ३०) सकाळी साडेदहा वाजण्याच्या बिरदवडी (ता. खेड) गावच्या हद्दीत घडली.
सुजय दिलीप कडूसकर (वय १७) आणि सोहम उल्हास कडूसकर (वय १७, दोघे रा. कोरेगाव बुद्रुक) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. योगेश विष्णू कड (३५, रा. किवळे, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गणेश वसुदेव मायकर (३०, रा. साळींबा, ता. वडवणी, जि. बीड) या कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजय कडूसकर आणि सोहम कडूसकर हे दोघे एमएससीआयटीच्या क्लासला दुचाकीने (क्र. एमएच १४ जी एक्स ५८६०) जात होते. बिरदवडी गावच्या हद्दीतील पवार वस्ती येथे कंटेनरचालक गणेश मायकरने (क्र. एमएच ४५ एएफ ००५४) भरधाव वेगाने दुचाकीस ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीवरील सुजय आणि सोहम यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. यामध्ये सुजय आणि सोहम हे दोघे कंटेनरच्या चाकाखाली आले.
दोघांनाही चाकात अडकलेल्या अवस्थेत कंटेनरने वेगात पंधरा ते वीस फूट फरफटत नेले. फिर्यादी योगेश कड यांनी कंटेनरचालकाला गाडी थांबवण्यासाठी आवाज दिला; परंतु तो थांबत नसल्याने आजूबाजूच्या लोकांनी आवाज देऊन कंटेनर चालकास थांबवले. जखमींना त्वरित चाकण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचाराअगोदरच डॉक्टरांनी दोघांना मयत घोषित केले.