वेश्याव्यवसायाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष; दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 10:08 IST2025-10-30T10:08:26+5:302025-10-30T10:08:38+5:30
वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतरही त्या ठिकाणी वेळेत न पोहोचता दुर्लक्ष केल्याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे

वेश्याव्यवसायाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष; दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन
पुणे : वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतरही त्या ठिकाणी वेळेत न पोहोचता दुर्लक्ष केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना मंगळवारी (दि. २८) निलंबित करण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी याबाबतचे आदेश दिले. मुकुंद जयराम शिंदे आणि विजय हरिभाऊ पोटे अशी निलंबित केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
दोघेही हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शल म्हणून कार्यरत होते. या परिसरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती शनिवारी (दि. २५) रात्री साडेअकराच्या सुमारास नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यावेळी हे दोघे ड्युटीवर होते. मात्र, कॉल आल्यानंतरही त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून तपासणी केली नाही. संबंधित कॉलचे गांभीर्य ओळखून आवश्यक ती कारवाई केली नसल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत चौकशीत दोघेही दोषी असल्याचे आढळले. त्यामुळे, यासंदर्भात आवश्यक ती कारवाई न केल्याने पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच, दोन्ही कर्मचाऱ्यांनी त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहिती दिली नाही. कर्मचाऱ्यांच्या या निष्काळजीपणाबाबत दोघांनाही निलंबित करण्यात आले.