पुणे-सोलापूर महामार्गानजीक दोन मृतदेह आढळले, ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 19:51 IST2023-12-25T19:51:30+5:302023-12-25T19:51:43+5:30
एकाच परिसरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी मृतदेह आढळल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे...

पुणे-सोलापूर महामार्गानजीक दोन मृतदेह आढळले, ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन
केडगाव (पुणे) :पुणे-सोलापूर महामार्गानजीक चौफुला धायगुडेवाडी येथे एकापाठोपाठ दोन मृतदेह आढळले. पोलिस यंत्रणेला अद्याप हे अनोळखी मृतदेह कोणाचे आहेत, याची ओळख पटलेली नाही. ओळख पटविण्यासाठी अद्याप धागादोरा मिळत नाही. सदर मृतदेह दिनांक ८ डिसेंबर व १० डिसेंबरदरम्यान आढळले आहेत. एकाच परिसरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी मृतदेह आढळल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. यवत पोलिस यांनी सदर इसमांची ओळख पटविण्यासाठी आवाहन केले आहे.
८ डिसेंबर रोजी बोरीपार्धी हद्दीतील पुणे-सोलापूर महामार्ग कारभारी चायनीज हॉटेलजवळील सिमेंटच्या कट्ट्यावर बेवारस मृत अवस्थेत आढळून आला. पुरुष जातीचे असून, वय अंदाजे ५० ते ५५ आहे. बारीक सडपातळ बांधा, बारीक काळे पांढरे केस, वाढलेली दाढी, अंगात खाकी फुल चौखडा शर्ट, फिक्कट निळ्या रंगाची नाइट पँट असे वर्णन आहे.
१० डिसेंबर रोजी पुणे-सोलापूर महामार्गाच्या कडेला बोरीपार्धी हद्दीत किरण उत्तम होले यांच्या पडीक जमिनीतील काटवणातील पाण्यातील चारीमध्ये मृतावस्थेत देह पडला होता. पुरुष जातीचे असून अंदाजे वय ४० ते ४५ आहे. सडपातळ बांधा आहे. डोक्यावर बारीक केस आहेत. पंढरा शर्ट, पांढरी बनियान, मेंदी रंगाची नाइट पँट अंगात परिधान केलेली आहे, अशी माहिती यवत पोलिसांनी दिली. तपास यवत पोलिस नाईक विशाल जाधव करीत आहेत.