वीस मिनिटे पोलीस अन् दरोडेखोरांमध्ये चकमक; दरोडेखोरांचा कोयत्याने हल्ला, बचावासाठी पोलिसांचा गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:48 IST2025-03-03T16:47:22+5:302025-03-03T16:48:27+5:30
पोलीस पथकाने तिसरा दरोडा टाकण्यापूर्वी या टोळीच्या मुसक्या आळवल्या आहेत

वीस मिनिटे पोलीस अन् दरोडेखोरांमध्ये चकमक; दरोडेखोरांचा कोयत्याने हल्ला, बचावासाठी पोलिसांचा गोळीबार
चाकण : दरोडेखोरांना जेरबंद करायला गेलेल्या पिंपरी- चिंचवड पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. बचावासाठी पोलीस उपायुक्तांनी देखील गोळीबार केल्याने एक दरोडेखोर जखमी झाला आहे. या चकमकीमध्ये पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड जखमी झाले आहेत. ही घटना चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोशी ( ता.खेड ) गावात रविवारी (दि.२ ) रात्री साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. घटनेत १. परश्या गौतम काळे,२. सचिन चंदर भोसले, ३. भिमेश ऊर्फ भिमा आदेश काळे, ४. मिथुन चंदर भोसले, ५. डांग्या चंदर भोसले, ६. अक्षय ऊर्फ किशोर हस्तलाल काळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. तर राजेश अशोक काळे याचा शोध सुरू आहे.
बहुळ ( ता.खेड ) गावातील फुलसुंदरवस्ती गेल्या आठवड्यात (दि२४ ) ला जयराम वाडेकर यांच्या घरावर या दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. त्यामध्ये पती-पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन जणांना अटक करण्यात आला होती,उर्वरित दरोडेखोरांच्या शोध तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, याच टोळीतील आणखी दोघे रविवारी (दि. २) पुन्हा चिंचोशी (ता.खेड ) गावात दरोडा टाकायला येणार आहेत. त्यानुसार,पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जराड यांच्यासह आठ जणांचे पथक घेऊन रात्री दहा वाजता गावात पोहचले. त्यावेळी मंदिर परिसरात दबा धरून बसलेले दरोडेखोरांनी शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र त्यावेळी मिथुन भोसले हा रस्त्याचे दिशेने पळाला व सचिन भोसले याने त्याचे पॅन्टमध्ये खोसलेला लोखंडी कोयता बाहेर काढुन पोलिसांच्या दिशेने वार करत धावून आला. त्याने कोयत्याने उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जन्हाड यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने हल्ला केला. हल्ला चुकविण्यासाठी मागे सरकले असता, सचिन भोसलेने केलेल्या कोयत्याचा वार छातीवर लागुन डीसीपी डॉ.शिवाजी पवार हे जखमी झाले. त्यानंतर त्याने लागलीच सपोनि प्रसन्न जन्हाड यांचे डोक्यावर जिवे ठार मारण्याचे उद्देशाने हल्ला केला. हल्ला चुकविण्यासाठी मागे सरकले असता तो डावे बाजुचे दंडावर लागुन प्रसन्न ज-हाड हे जखमी झाले. उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी स्वसंरक्षणार्थ आपल्या पिस्तूलमधून सचिन भोसले याचे पायाचे दिशेने दोन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी सचिन भोसले याचे उजव्या पायावर लागून तो खाली कोसळल्याने तपास पथकाने तात्काळ ताब्यात घेतले. अंधाराचा फायदा घेऊन दुसरा दरोडेखोर पळून जायच्या प्रयत्नात असतानाच पथकातील इतरांनी ताब्यात घेतले.
वीस मिनिटे चकमकीचा थरार रंगला
पोलीस आणि दरोडेखोर यांच्यात जवळपास वीस मिनिटे चकमकीचा थरार रंगला होता. डिसीपी पवार यांच्या छातीवर पाच टाके पडले आहेत. ते थोडक्यात बचवल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर एपीआय जराड यांना देखील मोठी दुखापत झाली आहे. उपचारानंतर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जखमी झालेल्या दरोडेखोरावर उपचार सुरु असून अल्पवयीन मुलगा ताब्यात आहे. डीसीपी शिवाजी पवार एपीआय प्रसन्न जराड आणि पथकाने तिसरा दरोडा टाकण्यापूर्वी या टोळीच्या मुसक्या आळवल्या आहेत. मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार,पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात यापूर्वी ९ गुन्हे दाखल - बहुळ येथील दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन चंदर भोसले आणि मिथुन चंदर भोसले हे पोलिसांच्या रडारवर होते. ते पुन्हा दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली होती.