समाजाची दिशाभूल रोखण्यासाठी सत्य समोर मांडावे : माधव भांडारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:19 IST2021-02-05T05:19:18+5:302021-02-05T05:19:18+5:30
पुणे : देशात सध्या काहींच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. त्यामुळे घटना, संसद आणि सर्वोच्च न्यायालय देखील नाकारले जात आहे. ...

समाजाची दिशाभूल रोखण्यासाठी सत्य समोर मांडावे : माधव भांडारी
पुणे : देशात सध्या काहींच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. त्यामुळे घटना, संसद आणि सर्वोच्च न्यायालय देखील नाकारले जात आहे. त्यामुळेच जे चुकीचे, खोटे आहे तेच रेटून बोलले जात आहे. देशात विघटन आणि विभाजन घडवले जात आहे. समाजाची दिशाभूल रोखण्यासाठी सुजाण नागरिकांनी सत्य समोर मांडले पाहिजे, असे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी रविवारी व्यक्त केले.
संविधानाच्या अभ्यासक ॲड. विभावरी बिडवे यांच्या '' निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा-मिथ्य आणि सत्य'' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे, माजी खासदार व भांडारकर संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत आणि लेखिका बिडवे उपस्थित होते. कोल्हापूरच्या कृष्णा पब्लिकेशन्सचे लक्ष्मण मलिकवाडकर यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
गेल्या वर्षी भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा मोदी सरकारने आणला आणि मोठा गदारोळ माजवला गेला. घुसखोरांसाठी हा कायदा नसून, तो निर्वासितांसाठी आहे याची जाणीव जेव्हा समाजाला झाली तेव्हा या कायद्याच्या बाजूने समाज एक झाला. शंका दूर झाल्या की गोंधळ कमी होतो त्यासाठी सत्य सांगत राहावे लागते असे सांगून भांडारी म्हणाले,
रावत म्हणाले, आज देशात हिंदुत्त्वाचा विचार मुख्य प्रवाहात आला आहे. हेच अनेकांच्या पोटदुखीचे कारण झाले आहे. हिंदूविरोध उघडपणे विस्थापितांकडून केला जात आहे. आपल्या देशात हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन एकत्र राहातात. त्यांची उपासना पद्धती वेगळी आहे. म्हणून राष्ट्र वेगळे असावे ही मूळ धारणाच चुकीची आहे. मातृभूमीची संकल्पना, शांततापूर्ण सहजीवन हिंदूविरोधी मुस्लिमांना मान्य नाही. त्यामुळे सत्य सांगणारी अशी पुस्तके खऱ्या अर्थाने बौध्दिक हत्यार आहे. त्याचा वापर केला पाहिजे.
प्रतिभा रानडे यांनी निर्वासितांची भीती घालवण्याची आजही गरज आहे. घुसखोरांना हाकलले पाहिजे असे सांगितले.
अक्षय वाटवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
......
आरे ला कारे उत्तर देण्याची गरज
सध्याचे शेतकऱ्यांसाठी आणलेले चांगले कायदे नको म्हणणारे दलालांसाठी काम करीत आहेत. त्यामुळे जेव्हा सत्य सांगण्याची वेळ येते तेव्हा देशाभिमानी नागरिकांनी आरे ला कारे उत्तर दिले पाहिजे असे माधव भांडारी यांनी सांगितले.
....