पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासहीत अनेक नेत्यांनी या प्रकरणाची दखल घेत योग्य ती कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे. आता या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. सध्या या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे आणि पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट सूचना दिल्या असल्याचे त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
फडणवीस म्हणाले, २१व्या शतकात सून आणि मुली यांच्यात फरक करणं चुकीचं आहे. कोणत्याही स्त्रीला अन्यायकारक वागणूक देणं हे अक्षम्य पाप आहे. हगवणे कुटुंबात जे घडलं ते अत्यंत वेदनादायक आहे. छळ करून आत्महत्या करायला लावणं सहन केलं जाणार नाही. पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आहे आणि ही कारवाई शेवटापर्यंत नेण्यात येईल. मकोका लावण्यासाठी विशिष्ट कायदेशीर निकष असतात. हे प्रकरण त्या निकषांत बसत असेल, तरच मकोका लावला जाईल. मात्र सध्या तरी निश्चितपणे काही सांगता येणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.
अजित पवारांनाही या घटनेचे गांभीर्य आहे. ते लग्नाला गेले म्हणजे त्यांना बोलावलं म्हणून गेले होते. त्यांचा या प्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध नाही. कोणतंही कुटुंब लग्नाला बोलावतं, तेव्हा आपण जातो. त्यानंतर पुढे काय घडणार, हे कुणालाही माहीत नसतं. त्यामुळे या विषयाला अनावश्यक फाटे न फोडणं योग्य ठरेल असे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
दरम्यान वैष्णवीच्या सासरच्या संपूर्ण कुटुंबाला अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासऱ्याला राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.