Pune Traffic: पुण्यातील ट्राफिक कमी होणार; शहरातील प्रमुख १५ रस्त्यांवर वाहतूक गतिमान होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 14:12 IST2025-01-05T14:11:35+5:302025-01-05T14:12:41+5:30
चौकांतील कोंडी दूर करणे, पदपथावरील अतिक्रमण हटविणे, दुभाजक, वाहने लावण्यासाठी उपलब्ध जागा या बाबींचा समावेश

Pune Traffic: पुण्यातील ट्राफिक कमी होणार; शहरातील प्रमुख १५ रस्त्यांवर वाहतूक गतिमान होणार
पुणे : वाहतूक पोलिस आणि महापालिकेने संयुक्तपणे केलेल्या उपाययोजनांमुळे सोलापूर रस्त्याप्रमाणेच शहरातील प्रमुख १५ रस्त्यांवरील वाहतूक लवकरच गतिमान होणार आहे. वाहतुकीचा वेग, तसेच सुधारणा करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता (पथ विभाग) अनिरुद्ध पावसकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी, तसेच वेग याबाबत पोलिस आणि महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. स्वारगेटपासून हडपसरपर्यंत विविध सुधारणा करण्यात आल्या. यात रामटेकडी पूल, रवीदर्शन, तसेच फातिमानगर चौकात वाहतूक विषय सुधारणा करण्यात आली. या कामांमुळे वाहतुकीचा वेग वाढला असून, कोंडीही दूर झाली आहे, असेही ते म्हणाले. या प्रसंगी मेटा आर्च कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद रोडे, वाहतूक नियोजक निखिल निहार, तसेच वाहतूक शाखेतील अधिकारी उपस्थित होते.
सोलापूर रस्त्याच्या धर्तीवर येत्या काही दिवसांत शहरातील प्रमुख रस्त्यांवर उपाययोजना केल्या जाणार आहेत. नगर रस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा, पाषाण, बाणेर, संगमवाडी, विमानतळ व्हीआयपी रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी रस्ता, कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रस्ता, गणेशखिंड रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता या रस्त्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या रस्त्यांवरील वाहतूक विषयक कामे केल्यानंतर कोंडीची समस्या कमी होऊन वाहतूक अधिक गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चौकांतील कोंडी दूर करणे, पदपथावरील अतिक्रमण हटविणे, दुभाजक, वाहने लावण्यासाठी उपलब्ध जागा या बाबींचा समावेश आहे. सोलापूर रस्त्यावर महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेल्या उपाययोजनांमध्ये रामटेकडी चौकात वैदुवाडी ते रामटेकडी चौकादरम्यान असलेले दुभाजक काढून रस्ता रुंद करण्यात आला. रस्त्याच्या मध्ये असलेले बस थांबे कडेला हलवण्यात आले. या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. सातत्याने कोंडी होणाऱ्या भैराेबानाला चौकात भैरोबानाला चौकीच्या पुढील वळणावरचा रस्ता रुंद करून स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली. फातिमानगर चौकातील वळण बंद करण्यात आले. या वाहनांना पर्यायी मार्ग दिल्याने येथील कोंडी सुटण्यास मदत झाली. शंकरशेठ रस्त्यावरील गोळीबार मैदान, रामटेकडी पूल, वैदवाडी चौक, हडपसर गाव चौक, गाडीतळ चौक, रविदर्शन चौक, पंधरा नंबर चौक, लक्ष्मी कॉलनी चौकात उपाययोजना करण्यात आल्या.
वाहतूक सुधारण्यासाठी आराखडा
शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुधारण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याच्या अंमलबजावणीचे काम सुरू असून, येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होईल, असे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.