वाहतुकीची समस्या, रस्त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करा; अजित पवार यांची पालिका प्रशासनाला सूचना
By राजू हिंगे | Updated: December 24, 2024 17:37 IST2024-12-24T17:37:01+5:302024-12-24T17:37:44+5:30
वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ‘माेबिलिटी प्लॅन’ तयार केला जाणार

वाहतुकीची समस्या, रस्त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करा; अजित पवार यांची पालिका प्रशासनाला सूचना
पुणे : शहरातील वाहतूककाेंडीचा विषय गंभीर झाला आहे. त्यासाठी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, मेट्राे, पीएमपी आणि वाहतूक पोलिस या सर्व घटकांना समाविष्ट करून ‘माेबिलिटी प्लॅन’ तयार केला जाणार आहे. शहरातील वाहतुकीची समस्या, रस्त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करावे. पालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात रस्त्यांच्या कामासाठी अधिक तरतूद करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
शहरातील वाहतूककाेंडीसह विविध प्रश्नांसंदर्भात पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला पालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., नगर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित हाेते. शहरातील वाहतूककाेंडीचा विषय गंभीर झाला आहे. त्यामुळे शहरातील वाहतूककाेंडी साेडविण्यासाठी पुढील महिन्यात बैठक आयोजित केली जाणार आहे. यात पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, मेट्राे, पीएमपी, वाहतुक पोलिस आदी सर्व घटकांना समाविष्ट करून माेबिलिटी प्लॅन तयार केला जाणार आहे.
समाविष्ट गावांतील मिळकत करबाबत पुढील महिन्यात बैठक
पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या गावांतील मिळकत कर वसुली थकली आहे. मिळकत कर आकारणीवरून ग्रामस्थांकडून तक्रारी झाल्या हाेत्या. त्यानंतर राज्य सरकारने या गावांतील मिळकत कर वसुलीला स्थगिती दिली आहे. याचा परिणाम महापालिकेच्या मिळकत कराच्या उत्पन्नावर हाेत आहे. त्याच वेळी समाविष्ट गावांतही नागरी सुविधा पुरावायच्या आहेत. याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले. त्यावर यासंदर्भात जानेवारी महिन्यात मंत्रालयात बैठक घेण्यात येईल. त्यातून मार्ग काढला जाईल, असे पवार यांनी सांगितले.
जीएसटीचा वाटा महापालिकेस मिळावा
समाविष्ट झालेल्या गावातील मूल्यवर्धित कराच्या (जीएसटी) उत्पन्नाचा वाटा ही महापालिका प्रशासनास मिळणे गरजेचे आहे, अशी मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे महापालिका प्रशासनाने केली. महापालिकेच्या हद्दीत गावांचा समावेश झाल्यानंतर लोकसंख्येचा विचार करता. या गावांतून गोळा केला जाणाऱ्या जीएसटीमधील वाटा महापालिकेला मिळत नाही. हा वाटा महापालिकेला मिळण्याची गरज आहे, त्यावर बैठकीत चर्चा झाली. तसेच समाविष्ट गावांच्या विकास आराखड्याचा विषय या बैठकीत मांडल्याचे पृथ्वीराज पी. बी. यांनी सांगितले.
रस्त्यांची कामे सलग करा
शहरात रस्त्याची कामे तुकड्या-तुकड्यात केली जात आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. शहरातील अतिक्रमणे, रस्ता रुंदीकरणाची कामे मार्गी लावली. रस्त्यांची कामे करताना तुकड्या-तुकड्यात नव्हे, तर सलग स्वरूपात करण्याचीही सूचना अजित पवार यांनी केली.