सद्गुरू शंकर महाराज उड्डाण पुलावर टँकर बंद पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 14:37 IST2025-05-10T14:31:21+5:302025-05-10T14:37:20+5:30

- भारती विद्यापीठ वाहतूक शाखेच्या वतीने तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

Traffic disrupted due to tanker stalling on Sadguru Shankar Maharaj flyover | सद्गुरू शंकर महाराज उड्डाण पुलावर टँकर बंद पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत

सद्गुरू शंकर महाराज उड्डाण पुलावर टँकर बंद पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत

धनकवडी -  धनकवडी येथील सदगुरू श्री शंकर महाराज उड्डाणपुलावर कात्रजकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या मार्गावर ॲसिडची वाहतूक करणारा टँकर बंद पडल्यामुळे भारती विद्यापीठ पोलिस ठाणे ते पद्मावती या दोन किलो मीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिवसभर लागल्या होत्या. त्यातच अंतर्गत रस्त्यांवरून मुख्य मार्गाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकी वाहनांची आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारांमुळे उड्डाणपूल वाहतूक कोंडीने व्यापून गेला होता. दरम्यान भारती विद्यापीठ वाहतूक शाखेच्या वतीने तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी क्रेन पाठविली मात्र ॲसिडने भरलेला टँकर क्रेनच्या साह्याने बाजूला घेताना पलटी होण्याची शक्यता असल्यामुळे फिटर ला बोलावून दिवसभर दुरुस्तीचे काम सुरू होते.

पुणे- सातारा बीआरटीमार्ग हा प्रंचड रहदारीचा असून शनिवारी (दि.१०) बाराच्या सुमारास गर्दीच्या वेळीच ॲसिड घेऊन जाणाऱ्या टँकरचा मुख्य पाटा तुटल्याने टँकर जागेवरच बंद पडला त्यामुळे उड्डाणपुलावरून जाणारी वाहतूक खोळंबली आणि वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. दरम्यान भारती विद्यापीठ वाहतूक शाखेच्या वतीने बंद पडलेल्या टँकरच्या बाजूला बॅरिकेड्स लावून उड्डाणपूल एका बाजूने तात्पुरता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक कोंडीवर ताण पडून दिवसभर पूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती.
 
मागील अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या पुणे-सातारा रस्त्यावरील नागरिकांच्या मागचे दुष्टचक्र काही केल्या संपायला तयार नाही. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशस्त रस्ते झाले. उड्डाणपूल बांधले मात्र, अतिक्रमणे, हातगाडी, पथारीवाले, रिक्षावाले आणि पार्किंगच्या समस्येने या रस्त्यांना व्यापून टाकले आहे. त्यात वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे ही अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. बालाजी नगर, अहिल्यादेवी चौक, पद्मावती रस्त्यांवर तर पदोपदी असुरक्षितता वाढत चालली असून वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहातून सर्वसामान्यांची सुटका कधी होणार? सातारा रस्ता कोंडी मुक्त कधी होणार? की वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात श्वास गुदमरून सर्वसामान्य वाहनचालकांचा अभिमन्यू होणार, असा संतप्त सवाल ‘लोकमत’शी बोलताना नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Traffic disrupted due to tanker stalling on Sadguru Shankar Maharaj flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.