लोणावळ्यातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असणारे भुशी धरण 'ओव्हरफ्लो'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 21:11 IST2021-06-18T21:02:44+5:302021-06-18T21:11:24+5:30
पर्यटन बंदीच्या आदेशामुळे धरणाच्या सांडव्यावर जाऊन पाण्याखाली भिजण्याला यावर्षी देखील मुकणार असल्याने पर्यटकांचा हिरमोड

लोणावळ्यातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असणारे भुशी धरण 'ओव्हरफ्लो'
लोणावळा : लोणावळा शहरातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण शुक्रवारी (दि. १८) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास 'ओव्हरफ्लो' झाले आहे. स्थानिक युवकांनी धरणाच्या सांडव्यावरील दोन मोर्यांची माती काढत धरणातील पाण्याला सांडव्यावरून वाहण्यासाठी वाट मोकळी करून दिली. मात्र पर्यटनबंदी आदेशामुळे पर्यटकांना धरणाच्या सांडव्यावर जाऊन भिजण्याचा आनंद यावर्षी देखील घेता येणार नाही अशी चिन्हे आहेत..
कोरोना महामारीमुळे मागील वर्षीपासून पर्यटनस्थळे बंद असल्याने भुशी धरण पर्यटकांना मुकले आहे. यावर्षी देखील अद्याप पर्यटनबंदी कायम असल्याने धरणावर जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधिक्षक नवनीत काँवत म्हणाले,लोणावळा शहरात पर्यटकांना येण्यासाठी कोणतीही बंदी नाही.मात्र, त्यांना कोणत्याही पर्यटनस्थळांवर देखील जाता येणार नाही.
महाराष्ट्र शासन व पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये अजूनही संचार व जमावबंदीचे आदेश तसेच पर्यटनस्थळे बंदचे आदेश लोणावळ्यात लागू आहे. पर्यटक लोणावळ्यात येऊ शकतात, हाॅटेल बंगले व फार्महाऊस येथे नियमांचे पालन करून राहू शकतात. मात्र त्यांना कोणत्याही पर्यटनस्थळांवर जाता येणार नाही. सर्व पर्यटनस्थळे बंद असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे.
लोणावळा शहर व मावळ तालुक्यातील गुरुवार पासून जोरदार पाऊस सुरू असल्याने डोंगर भागातून मोठे मोठे धबधबे वाहू लागले आहेत. यामुळे आकाराने लहान असलेले भुशी धरण दोनच दिवसांत ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच विविध भागातून धबधबे देखील वाहू लागले आहेत.