मुसळधार...! उद्योगनगरीला धोऽ..धो..धुतले,रस्ते गेले पाण्याखाली; वातावरणात गारठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 08:41 IST2025-05-28T08:37:09+5:302025-05-28T08:41:34+5:30
- पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ;; चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराच्या पायरीला लागले पाणी; नोकरदार आणि बाजारकरूंची तारांबळ, रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना पाण्यातून मार्ग काढणे कठीण

मुसळधार...! उद्योगनगरीला धोऽ..धो..धुतले,रस्ते गेले पाण्याखाली; वातावरणात गारठा
पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी (दि. २७) दिवसभर पावसाचा जोर कायम होता. सोमवार आणि मंगळवारच्या दमदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पावसाने नोकरदार आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना ओलेचिंब करून टाकले. आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने शहरवासीय गारठले आहेत. नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे. पवन धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून, पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
शहर आणि उपनगरांत मंगळवारी सकाळच्या सत्रात पावसाचा जोर काहीसा कमी असला, तरी दुपारनंतर तो पुन्हा वाढला. सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच राहिली. यामुळे बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवरील वर्दळ कमी दिसून आली. पावसामुळे अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. जे नागरिक खरेदीसाठी किंवा फिरायला घराबाहेर पडले, त्यांना छत्र्या-रेनकोटचा आधार घ्यावा लागला. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना पाण्यातून मार्ग काढणे कठीण झाले होते. त्यामुळे शहरातील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.
तिन्ही नद्यांना पूर शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी नद्यांना पूर आला आहे. नद्यांच्या दोन्ही बाजूंच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराच्या पायरीला पाणी लागले आहे.
रस्त्यांवर पाण्याचे लोंढे
मंगळवारी दिवसभर शहरात, तसेच धरणक्षेत्रातही पावसाच्या सरी कोसळत होत्या. महापालिकेने ड्रेनेजची स्वच्छता केल्याचा दावा केला असला, तरी पावसाचा जोर जास्त असल्याने मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहत होते. काही भागांत वाट न मिळाल्याने रस्त्यावर गुडघाभर उंचीचे पाणी साठले. त्यामुळे रस्त्यावरील तसेच काही ठिकाणी सोसायट्यांच्या पार्किंगमध्येही चारचाकी गाड्या पाण्यात होत्या.
महामार्गावर वाहतूक कोंडी
पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथील सेंट्रल चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. चाकरमान्यांच्या नावावर लेट मार्क पडत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. येथील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
सूर्यदर्शन नाहीच; तापमानात मोठी घट
पावसामुळे शहरातील तापमानात मोठी घट झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला चाळिशीपार गेलेले तापमान गेल्या आठवड्यात जवळपास दहा अंशांनी घसरले. मंगळवारी चिंचवड येथे कमाल तापमान २४.१, तर किमान तापमान २२.६ अंश नोंदविण्यात आले. गेल्या बुधवार (दि. २१) पासून सूर्यदर्शन झालेले नाही.