पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या कामावरून टोलवाटोलवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 18:56 IST2025-01-07T18:56:00+5:302025-01-07T18:56:21+5:30

केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये खर्च कोणी करायचा, हेच नाही ठरले

Toll booth closed due to Pune-Lonavala railway work | पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या कामावरून टोलवाटोलवी

पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या कामावरून टोलवाटोलवी

पुणे :पुणे-लोणावळ्यादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या लोहमार्गाचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून लालफितीत अडकले आहे. त्यामुळे या लोहमार्गावरील तिसरा व चौथा ट्रॅक मंजुरीनंतरही कागदावरच राहिला आहे. आता या लोहमार्गाच्या कामाला केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये कोण किती खर्च करायचे हे अजून ठरलेले नाही. त्यामुळे लोहमार्गाचे काम कधी सुरू होणार हे अद्याप ठरले नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक धर्मवीर मीना यांनी सांगितले.

मुंबईवरून दक्षिण भारतात जाण्यासाठी पुणे-लोणावळा लोहमार्ग हे महत्त्वाचे आहे. पुणे-मुंबईदरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी १६०० कोटींचा द्रुतगती मार्ग उभारला गेला. तर दुसरीकडे गेल्या पाच वर्षांत मेट्रोसाठी २५ हजार कोटी खर्च होत आहेत. मात्र, या प्रकल्पांच्या तुलनेत कमी खर्च असलेला पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाइनचा प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून रखडला आहे. गेल्या २४ वर्षांपूर्वी १९९७-९८ मध्ये पुणे-लोणावळा लोहमार्गाला पहिल्यांदा मंजुरी मिळाली होती. यानंतर २०१४-१५ मध्ये विकास आराखडा तयार करण्यात आला. दरम्यान, रेल्वे बोर्डाने २०१६ मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या लाइनसाठी ९४३.६० कोटींच्या खर्चाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला. २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनथ शिंदे यांनी या मार्गासाठी राज्य सरकारकडून बजेट मंजूर केल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर राज्य शासनाकडूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पुणे-लोणावळा या ६३.८४ किलोमीटर लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला १९९७-९८ मध्ये मंजुरी मिळाली. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही काम सुरू झालेले नाही.

महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठीच तरतूद

राज्य आणि केंद्र शासनाकडून त्यांच्या राजकीयदृष्ट्या सोयीचे आणि लाभदायी ठरणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यात मेट्रो प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मोठी तरतूद केली जात आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा परिणाम रेल्वे वाहतूक आणि उत्पन्नावर होत आहे.

Web Title: Toll booth closed due to Pune-Lonavala railway work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.