”जीवनाला कंटाळले..”, चिठ्ठी लिहिली अन् गर्भवतीने उचलले टोकाचे पाऊल; कोंढव्यातील हृदयद्रावक घटना
By किरण शिंदे | Updated: July 2, 2025 21:26 IST2025-07-02T21:26:16+5:302025-07-02T21:26:43+5:30
“मी जीवनाला कंटाळले आहे, कोणावरही कोणतीही तक्रार नाही”, असे चिठ्ठीत लिहून जीवनयात्रा संपवली

”जीवनाला कंटाळले..”, चिठ्ठी लिहिली अन् गर्भवतीने उचलले टोकाचे पाऊल; कोंढव्यातील हृदयद्रावक घटना
पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात बुधवार (2 जुलै) दुपारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. एका सात महिन्यांच्या गर्भवती महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. खजुरा सुरेश सुनार (वय १९) असे आयुष्य संपवलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सदर महिला आणि तिचा पती नेपाळमधील रहिवासी असून, मागील काही महिन्यांपासून कोंढवा परिसरात भाड्याने राहत होते. पती सुरक्षा रक्षकाची नोकरी करत असून पत्नी गृहिणी होती. दररोजप्रमाणे पती कामावर गेल्यानंतर दुपारी या महिलेने राहत्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. सायंकाळी पती घरी परतल्यानंतर त्याने अनेक वेळा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा पत्नीने गळफास घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याने तातडीने कोंढवा पोलीस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतदेह खाली उतरवून पोस्टमॉर्टेमसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. घराची तपासणी करताना पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीत, “मी जीवनाला कंटाळले आहे. कोणावरही कोणतीही तक्रार नाही.” असे लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोंढवा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मानसिक आरोग्य आणि गर्भवती महिलांवरील मानसिक तणाव या बाबी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.