भिगवण येथे वाघाची कातडी जप्त

By Admin | Updated: May 9, 2017 03:34 IST2017-05-09T03:34:00+5:302017-05-09T03:34:00+5:30

पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावरील सकुंडेवस्तीजवळ असणाऱ्या पुलाखाली तब्बल तीन वाघांच्या कातडे असलेल्या तीन पिशव्या पोलिसांनी जप्त केल्या.

The tiger's skin was seized at Bhigavana | भिगवण येथे वाघाची कातडी जप्त

भिगवण येथे वाघाची कातडी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
भिगवण : पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावरील सकुंडेवस्तीजवळ असणाऱ्या पुलाखाली तब्बल तीन वाघांच्या कातडे असलेल्या तीन पिशव्या पोलिसांनी जप्त केल्या.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नीलकंठ राठोड यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार : सकाळी ९च्या सुमारास भिगवण चौकात पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना, पोलिसांना सकुंडेवस्तीशेजारी असणाऱ्या पुलाखाली संशयास्पद पिशव्या असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस हवालदार अनिल सातपुते यांनी तातडीने ही माहिती अधिकारी राठोड यांना कळवित घटनास्थळी जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना तीन वेगवेगळ्या पिशवीत तीन वाघांच्या कातड्या आढळून आल्या. ही कातडी पोलिसांनी ताब्यात घेऊन याबाबतीत वनविभागाचे अधिकारी यांना बोलावणे पाठवले. ही कातडी परराज्यांतून आणली जात असावी, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात काळसर रंगाचा पट्टेरी वाघ आढळत नाही आणि सापडलेल्या कातडीमध्ये एक काळसर पट्टेरी वाघाचे कातडे आहे. तीन कातड्या एकत्र सापडल्याने एकच खळबळ उडाली असून, यासंख्येवरून वन्यप्राण्यांच्या शिकार करून त्यांच्या तस्करीचे मोठे जाळे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलीस अधिकारी राठोड यांनी नाकाबंदीमुळे या प्रकारातील आरोपी घाबरून कातडी टाकून गेला असल्याची शक्यता व्यक्त केली. लोकवस्तीत अशा प्रकारे कातडी टाकून आरोपी पळाल्याने पोलीस आणि वनविभागाच्या समोर मोठे आव्हान उभे राहिल्याचे चित्र आहे, पुढील तपास करुन आरोपी सापडणार का, हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबतीत वनविभागाचे वनपाल अशोक नरुटे तसेच वन रक्षक योगीता नायकवडी यांनी सापडलेली कातडी वाघ सदृश प्राण्यांची असल्याचे सांगून ही कातडी ताब्यात घेऊन फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठविले आहेत.

Web Title: The tiger's skin was seized at Bhigavana