पुण्यात थरार! भररस्त्यात पत्नीवर चाकूने सपासप वार करुन निर्घृण खून; भेकराईनगरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 21:09 IST2021-04-07T21:08:15+5:302021-04-07T21:09:30+5:30
सागर आणि शुभांगी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला असून ते दोघे जण उरुळी देवाची येथे राहत होते.

पुण्यात थरार! भररस्त्यात पत्नीवर चाकूने सपासप वार करुन निर्घृण खून; भेकराईनगरमधील घटना
पुणे : सारखी माहेरी जात सासरी येण्यास नकार दिल्याने भररस्त्यात झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या पोटात चाकूने वार करुन तिचा खून केला.
शुभांगी सागर लोखंडे (वय २१, रा. भेकराईनगर) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. सागर बाळु लोखंडे (वय २३, रा. उरुळी देवाची मुळ रा. विजयवाडी, अकलुज) याला हडपसर पोलिसांनीअटक केली आहे. ही घटना भेकराईनगरमधील शिवशक्तीनगर चौकात बुधवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी रेणुका राजू हनवते (वय ३७, रा. भेकराईनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर आणि शुभांगी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघे जण उरुळी देवाची येथे राहत होते. सागरला दारु आणि गांजाचे व्यसन आहे. त्यामुळे त्यांच्यात वाद होऊन शुभांगी ही वारंवार भेकराईनगर येथे माहेरी आईकडे येत असे. आताही शुभांगी ही माहेरी आली होती. तेथून ती आज सकाळी कामाला जाण्यास निघाली होती. वाटेत शिवशक्ती चौकात सागरने शुभांगीला गाठले व तिला घरी येण्यास सांगितले. त्याला शुभांगीने नकार दिला. त्यावरुन त्यांच्यात रस्त्यातच वाद सुरु झाला. त्यावेळी सागरने शुभांगीच्या पोटात चाकूने वार केले. गंभीर जखमी झाल्याने शुभांगी जागेवर रक्ताच्या थारोळ्यात पडली. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच तिचा मृत्यु झाला. हडपसर पोलिसांनी सागर लोखंडे याचा शोध घेऊन त्याला अटक केली.