नऱ्हे गावात ब्रेक फेल झालेल्या ट्रकचा थरार; एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 14:16 IST2019-12-18T14:15:59+5:302019-12-18T14:16:28+5:30
ब्रेक फेल झालेल्या ट्रकने मोटारसायकलस्वाराला धडक दिली.

नऱ्हे गावात ब्रेक फेल झालेल्या ट्रकचा थरार; एकजण जखमी
पुणे : नऱ्हे येथे ब्रेक फेल झालेल्या ट्रकने एका मोटारसायकलस्वाराला धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना साडेबाराच्या सुमारास नऱ्हे येथील भूमकर पुलाखाली घडली. भरत वाघ ( वय ४०, राहणार आंबेगाव, पुणे) असे जखमी इसमाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्याकडून भोसरीकडे साखरेची पोती घेऊन निघालेला ट्रक सर्व्हिस रस्त्याने भूमकर पुलाखाली आला असता ब्रेक लागत नसल्याचे ट्रकचालकाच्या लक्षात आल्याने त्याने पुलाला गाडी धडकावून गाडी थांबविण्याच्या उद्देशाने पुलाच्या दिशेने जात होता. दरम्यान, मोटारसायकलस्वार रस्त्याने जात असल्याने त्याला ट्रकची जोराची धडक बसली. या अपघातात मोटारसायकलस्वारच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघातानंतर काही वेळ भूमकर पुलाखाली वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र आदलिंग व वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली तसेच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी राहुल बांडे, अनिल बोत्रे, अनंत सुळ यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला केला.