भाचीचा विनयभंग करणाऱ्या सावत्र मामास तीन वर्षांचा कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 16:05 IST2022-07-29T16:04:26+5:302022-07-29T16:05:01+5:30
थेरगाव परिसरात ही घटना घडली होती....

भाचीचा विनयभंग करणाऱ्या सावत्र मामास तीन वर्षांचा कारावास
पुणे : घरात शिरून भाचीचा विनयभंग करणाऱ्या २३ वर्षीय सावत्र मामास न्यायालयाने तीन वर्षांचा साधा कारावास व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विक्रांत खंदारे यांनी हा निकाल दिला.
दंडाच्या रकमेतील तीन हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावेत. आरोपीने दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसांचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे. ३० एप्रिल २०१५ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास थेरगाव परिसरात ही घटना घडली होती. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडितेच्या घरात प्रवेश करीत हाताला धरून ओढून घेत तिचा विनयभंग केला. तसेच, मनास लज्जा येईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात साहाय्यक सरकारी वकील रेणुका देशपांडे-कर्जतकर यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. आरोपीने केलेला गुन्हा हा पूर्ण विचार व तयारीने केला आहे. त्याचा उद्देश हा पीडितेस मनात लज्जा उत्पन्न करण्याचा होता हे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे त्याला जास्तीतजास्त शिक्षा देण्याची मागणी ॲड. देशपांडे-कर्जतकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.