अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 20:44 IST2019-01-21T20:42:00+5:302019-01-21T20:44:35+5:30
इमारतीच्या गच्चीवर खेळत असलेल्या आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणा-याला ३ वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे कारावास
पुणे : इमारतीच्या गच्चीवर खेळत असलेल्या आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणा-याला ३ वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी हा निकाल दिला आहे.
राजेंद्र दत्तोबा कोंढरे (वय ४०, रा. मार्के टयार्ड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी १९ फेब्रुवारी २०१५ रोजी मार्के टयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका इमारतीच्या गच्चीवर मैत्रिणीसोबत खेळत होती. तेथे कोंढरे याने तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी काम पाहिले. त्यांनी तीन साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलगी आणि तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयीन कामकाजासाठी सहायक फौजदार बाजीराव पाटील यांनी मदत केली. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिना कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.