Pune Crime : न्यूड फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर तिघांकडून बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 18:37 IST2021-12-18T18:06:35+5:302021-12-18T18:37:56+5:30
Pune Crime : पीडित तरुणीने याप्रकरणी पुणे येथील सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली

Pune Crime : न्यूड फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर तिघांकडून बलात्कार
पिंपरी : जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवून तरुणीचे न्यूड फोटो व व्हिडिओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपळे गुरव येथे बुधवारी (दि. १५ डिसेंबर) ही घटना घडली.
प्रथमेश उर्फ सनी खैरे, स्वराज कदम (दोघेही रा. पिंपळे गुरव) तसेच प्रथमेश याचा अनोळखी मित्र यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित १९ वर्षीय तरुणीने याप्रकरणी पुणे येथील सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर सांगवी पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रथमेश खैरे याने तरुणीला पिंपळे गुरव येथे बोलावून घेऊन तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्याचे न्यूड फोटो व्हिडिओ काढले. त्यानंतर प्रथमेश याचा मित्र स्वराज कदम हा तेथे आला. स्वराज यांने देखील पीडित तरुणीशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर पीडित तरुणी सायंकाळी सहाच्या सुमारास तेथून निघून गेली.
त्यानंतर आरोपींनी रात्री दहाच्या सुमारास पुन्हा फोन करून तरुणीला येण्यास सांगितले. मी येत नाही, असे पीडित तरुणीने सांगितले. त्यावेळी तरुणीचा न्यूड व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी दिली. त्याला घाबरून फिर्यादी पीडित तरुणी पुन्हा आरोपींकडे रात्री साडेअकराला पोहोचली. त्यावेळी आरोपी प्रथमेश आणि त्याच्या अनोळखी मित्राने देखील फिर्यादीची जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. पीडित तरुणीने याप्रकरणी पुणे येथील सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर हा गुन्हा सांगवी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.