दरोडेखोरांच्या मारहाणीत ३ पोलीस जखमी

By Admin | Updated: March 18, 2015 22:55 IST2015-03-18T22:55:04+5:302015-03-18T22:55:04+5:30

मलठण (ता. दौंड) येथील रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या मुंबई-सोलापूर या मिनी सिद्धेश्वर एक्स्प्रेसवरील सशस्त्र दरोडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी झाला.

Three policemen injured in the assault of dacoits | दरोडेखोरांच्या मारहाणीत ३ पोलीस जखमी

दरोडेखोरांच्या मारहाणीत ३ पोलीस जखमी

दौंड : मलठण (ता. दौंड) येथील रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या मुंबई-सोलापूर या मिनी सिद्धेश्वर एक्स्प्रेसवरील सशस्त्र दरोडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी झाला. दरम्यान, दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात ३ पोलीस जखमी झाले आहेत. या वेळी १० ते १२ दरोडेखोरांनी रेल्वेवर तुफान दगडफेक केल्याने प्रवासी हतबल झाले होते. ही घटना पहाटे सव्वातीनच्या सुमारास घडली़
जखमी पोलिसांनी जिवावर उदार होऊन बाबू सुखदेव काळे (रा. राजेगाव, ता. दौंड) या दरोडेखोराला जेरबंद केले, तर उर्वरित १० ते १२ दरोडेखोर पळून गेले आहे. स्वप्निल शिंदे, संजय पाचपुते, योगेश जगताप हे तीन पोलीस जखमी झाले असून, त्यांच्यावर पिरॅमिड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मुंबई-सोलापूर मिनी सिद्धेश्वर एक्स्प्रेसने बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास दौंड रेल्वे स्थानक सोडले़ सुमारे १५ मिनिटांतच ती मलठण स्थानकात पोहोचली़ या रेल्वे स्थानकावर तिघेही पोलीस बंदोबस्तावर होते़
या वेळी प्लॅटफॉर्मवर स्वप्निल शिंदे हे पोलीस, तर रेल्वे लाईनच्या दुसऱ्या लाईनला संजय पाचपुते, योगेश जगताप पहारा देत होते. तेवढ्यात १0 ते १२ सशस्त्र दरोडेखोर आले. त्यांनी गाडीवर तुफान दगडफेक केली. या वेळी स्वप्निल
शिंदे यांनी बाबू काळे या दरोडेखोराला पकडले.
हे पाहून त्याच्या साथीदारांनी आपला मोर्चा शिंदे यांच्याकडे वळविला़ त्यांनी चाकूने शिंदे यांच्या हातावर आणि बोटावर तीन वार केले. तरीदेखील मोठ्या हिमतीने शिंदे यांनी त्या दरोडेखोराला पकडून ठेवले. त्यानंतर उर्वरित २ पोलिसांच्या दिशेने दरोडेखोरांनी दगडफेक केली. या दगडफेकीत संजय पाचपुते, योगेश जगताप हे दोघे जखमी झाले. त्यांच्या पाठीवर, पोटावर दगड लागल्याने ते
जखमी झाले़
असे असतानाही तिघांनीही जखमी अवस्थेत दरोडेखोराला पकडून स्टेशनमास्तरच्या केबिनमध्ये आणले. साथीदाराला केबिनमध्ये घेऊन गेल्याचे पाहिल्यावर अन्य दरोडेखोर दगडफेक करीत पळून गेले़ पोलिसांनी या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना कळविली़ दौंडहून अधिक कुमक आल्यावर अधिक तपासासाठी त्याला दौंड रेल्वे पोलीस ठाण्यात आणले.
घटनास्थळी रेल्वेचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तायत्र सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक वसंत शेटे यांनी पाहणी करून मध्यरात्रीच्या सुमारास जखमी पोलीसांना दौंड येथे आणले. याप्रकरणी मिनी सिद्धेश्वर एक्स्प्रेसवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

४दौंड रेल्वे पोलीस स्वप्निल शिंदे, संजय पाचपुते, योगेश जगताप या तिघांच्या सतर्कतेमुळे मिनी सिद्धेश्वर एक्स्प्रेसवरील दरोडा अयशस्वी झाला; अन्यथा दरोडेखोरांनी रेल्वेत हैदोस घातला असता. कारण, मलठण रेल्वे स्थानक हे निर्जन परिसरात असून, त्या परिसरात दिवसादेखील भीतीचे वातावरण असते. वरील तिन्ही पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

अकारण थांबविल्या जातात गाड्या
मलठणला गाडीला थांबा नाही़ दौंड ते भिगवण दुहेरी मार्ग असतानाही रात्रीच्या वेळी वाटेत गाड्या थांबविल्या जाऊ नयेत, अशा सूचना रेल्वेला देण्यात आल्या आहेत़ तरीही, वाटेत गाड्या थांबविल्या जातात़ रेल्वेगाड्यांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाची आहे़ तरीही सामाजिक कर्तव्य म्हणून रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकावर बंदोबस्त ठेवला जातो़ दरोड्याचे प्रकार घडत असल्याने वाटेत गाड्या थांबवू नयेत, अशा आमच्या सूचना आहेत़
- वसंत शेटे, पोलीस उपनिरीक्षक

Web Title: Three policemen injured in the assault of dacoits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.