पुणे : शहरातील तीन पोलिस ठाण्यांमध्ये दाखल चोरीच्या घटनांमध्ये ५ लाख ८८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
यात पहिल्या घटनेत, वैशाली गोरक्षनाथ वालगुडे (४२, रा. धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान चोरांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर चोराने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा १ लाख ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान, याचवेळी चोराने शेजारी राहणारे संदीप भट (५७) यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून चोरीचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील अधिक करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, विकास मानकर (४०, रा. वाकड) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या वाडेबाल्हाई (ता. हवेली) येथील फार्म हाऊसच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून ३५ हजार रुपयांचा टीव्ही व डीव्हीआर चोरांनी चोरून नेला. हा प्रकार १८ ते १९ मार्च दरम्यान घडला. पोलिस उपनिरीक्षक तुकाराम सुरवसे तपास करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत, इरफान शेख (रा. केशवनगर, मुंढवा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ११ एप्रिल रोजी पहाटे ४ ते ५ च्या सुमारास चोरांनी त्यांच्या घराचे सेफ्टी डोअरचे लॉक तेथे अडकून ठेवलेल्या चावीने उघडले. घरात प्रवेश केल्यानंतर तिसऱ्या मजल्यावर जात चोरांनी बेडरूम मधील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ३ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय माळी करीत आहेत.