तिघे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील, खडखड होणारच; चंद्रकांत पाटलांनी नाराजीचा चेंडू भिरकावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 10:34 IST2025-04-15T10:32:57+5:302025-04-15T10:34:49+5:30

खडखड होणे हे जिवंत असल्याचे चिन्ह असून तिन्ही नेते सरकारमध्ये व्यवस्थित काम करत आहेत

Three from different backgrounds there will be a clash Chandrakant Patil spoke about the displeasure of the Mahayuti | तिघे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील, खडखड होणारच; चंद्रकांत पाटलांनी नाराजीचा चेंडू भिरकावला

तिघे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील, खडखड होणारच; चंद्रकांत पाटलांनी नाराजीचा चेंडू भिरकावला

पुणे: राज्याचे नेतृत्व करणारे तिघेही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील आहेत, त्यांच्यात खडखड ही होणारच. ती नाही झाली तर त्यांना हलवून पाहावे लागेल ते जिवंत आहेत का? खडखड होते याचा अर्थ ते जिवंत आहेत अशा शब्दांमध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीमधील नेत्यांच्या नाराजीच्या प्रश्नांचा चेंडू भिरकावून लावला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अनेक नेत्यांनी सोमवारी अभिवादन केले. डॉ. आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद आहेत का, शिंदे यांची नाराजी आहे का, या प्रश्नांना तसे काहीही नाही असे सांगितले व खडखड होणे हे जिवंत असल्याचे चिन्ह आहे असे सांगितले. तिन्ही नेते सरकारमध्ये व्यवस्थित काम करत आहेत असे ते म्हणाले. सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनाही पाटील यांनी लक्ष्य केले. शिवछत्रपतींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री प्रथमच रायगडावर गेले. तिथे त्यांचे स्वागत करण्याचे सोडून संजय राऊत गेले तीन दिवस उगीचच काहीही टीका करत आहेत. त्यांना माहिती नाही पण, शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर स्वत: ५०० पानांचे पुस्तक लिहिले आहे. त्याचे प्रकाशन दिल्लीत करायचे की महाराष्ट्रात यावर चर्चा सुरू आहे, ते प्रकाशन लवकरच होईल. राऊत यांनी ते वाचले तर त्यांना चक्कर येईल, असा टोला पाटील यांनी लगावला.

डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेली देशाची राज्यघटना अचूक आहे. त्यात कोणत्याप्रसंगी काय करायचे याचे सविस्तर मार्गदर्शन आहे. त्यांच्यामुळेच देशाच्या १९५२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत स्त्री, पुरुष, गरीब आणि श्रीमंत अशा सर्वांना मतदान करता आले.

उपेक्षित घटक समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा : मिसाळ

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, डॉ. आंबेडकर यांचे विचार, त्यांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी काय करता येईल याचे मंत्री झाल्यावर मी गेले चार महिने नियोजन करत आहे. आता पुढील दोन वर्षे त्याप्रमाणे काम करणार आहे. समाजातील उपेक्षित घटक समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा अशी डॉ. आंबेडकर यांची इच्छा होती. त्या प्रमाणे काम करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

राज्यघटना जगण्याची ढाल : चाकणकर

चाकणकर म्हणाल्या, डॉ. आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळेच माझ्यासारखी एका साध्या कुटुंबातील महिला या पदापर्यंत येऊन पोहोचली. सर्व महिलांनी कुठेही जाताना राज्यघटना बरोबर ठेवायला हवी. ती जगण्याची ढाल आहे. त्यामध्ये त्यांच्यासाठी कायदा आहे, तरतुदी आहेत. प्रत्येक महिलेने राज्यघटना वाचायलाच हवी.

Web Title: Three from different backgrounds there will be a clash Chandrakant Patil spoke about the displeasure of the Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.