राज्यातील हजारो महिला कर्करोगग्रस्त; आरोग्य तपासणीत चिंताजनक आकडेवारी समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 12:43 IST2025-11-09T12:41:22+5:302025-11-09T12:43:15+5:30
राज्यभरातील ३ लाख ३८ हजार २७९ शिबिरांमध्ये एक कोटी ५१ लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ॲनिमिया, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत.

राज्यातील हजारो महिला कर्करोगग्रस्त; आरोग्य तपासणीत चिंताजनक आकडेवारी समोर
पुणे : राज्यातील महिलांमध्येकर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, राज्य सरकारच्या व्यापक तपासणी मोहिमेतून धक्कादायक आकडे समोर आले आहेत. ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेल्या तपासणी शिबिरांमध्ये तब्बल एक कोटी ५१ लाख महिलांची तपासणी करण्यात आली, ज्यात हजारो महिला कर्करोगाच्या विळख्यात सापडल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
राज्यात महिलांच्या आरोग्यासाठी राबविलेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहिमेतून चिंताजनक वास्तव उघड झाले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, तपासणी झालेल्या महिलांपैकी १७ हजार ६१८ महिलांना मुख कर्करोगाचा संशय, तर ४५० महिलांना स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले आहे. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक संशयित रुग्ण आढळले असून, राज्यातील एकंदर आरोग्य स्थितीबाबत चिंता व्यक्त करायला लावणारी ही आकडेवारी आहे.
राज्यभरातील ३ लाख ३८ हजार २७९ शिबिरांमध्ये एक कोटी ५१ लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ॲनिमिया, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. संशयित रुग्णांना पुढील तपासणी आणि मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मुख कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक
नागपूर: ३,७४४ संशयित रुग्ण
बुलडाणा: १,२६९
अमरावती: १,४६०
नाशिक: ५६५ संशयित महिला
एकूण २,३४९ बायोप्सी नमुन्यांपैकी ८४१ महिलांना मुख कर्करोग असल्याचे निश्चित झाले आहे.
स्तनाचा कर्करोग वाढत्या चिंतेचा विषय
स्तन तपासणीत ८२ लाख ५१ हजार महिलांची तपासणी झाली. यामध्ये १२ हजार २८६ संशयित रुग्णांपैकी १,४७० महिलांची बायोप्सी करण्यात आली आणि ४५० महिलांना स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले.
नाशिक: ३० महिला
सातारा: २८ महिला
सांगली: २९ महिला
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचेही प्रकरणे
या तपासणीत ५४ लाख ४७ हजार महिलांची तपासणी झाली असून, १० हजार संशयित रुग्णांपैकी २३४ महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. नागपूर, बुलडाणा, पुणे, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांत हे प्रमाण अधिक आढळले आहे.