Hijab Controversy: पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये हिजाबच्या समर्थनार्थ शेकडो तरुणी एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 18:58 IST2022-02-18T18:57:53+5:302022-02-18T18:58:08+5:30
हिजाब प्रकरणाचा अंतिम निकाल येईपर्यंत विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये धार्मिक पोशाख परिधान करू नये. असेही हायकोर्टने आपल्या आदेशात म्हटले आहे

Hijab Controversy: पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये हिजाबच्या समर्थनार्थ शेकडो तरुणी एकत्र
पुणे : कर्नाटकातून उदयास आलेला हिजाब वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कर्नाटक हायकोर्टने 10 फेब्रुवारीला महत्त्वाचा आदेश दिला होता. हिजाब प्रकरणाचा अंतिम निकाल येईपर्यंत विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये धार्मिक पोशाख परिधान करू नये. असेही हायकोर्टने आपल्या आदेशात म्हटले होते. त्यानंतर देशात सर्वत्र हिजाबच्या समर्थनार्थ पडसाद उमटू लागले आहेत.
महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे हिजाबच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. त्यामध्ये बुरखा घालून महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. पुण्यातही शेकडो मुस्लिम तरुणी हिजाबच्या समर्थनार्थ आझम कॅम्पस येथे एकत्र आल्या आहेत. त्यांनी कॅम्पस परिसरात बुरखा घालून हिजाब वादाचा निषेध केला आहे.
''आझम कॅम्पस येथे तरुणींनी आज हिजाबच्या समर्थनार्थ निदर्शने केली. हिजाब हा मुस्लिम महिलांचा हक्क आहे आणि तो हिरावून घेतला जाऊ शकत नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तर आमच्या हिजाब घालण्याने कुणालाही समस्या नसावी. हिजाबसोबत छेडछाड करण्याचा अर्थ म्हणजे तुम्ही संविधानासोबत छेडछाड करत आहात. असही त्या म्हणाल्या आहेत''
महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आंदोलने झाली
यापूर्वी पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम महिलांसह निदर्शने केली होती. याच्या निषेधार्थ हिंदू महासंघाच्या महिलांनी भगव्या साडीत मुलांसह रोड निदर्शने केली होती. मुस्लिम मुली हिजाब घालून शाळेत आल्या तर त्या आपल्या मुलांना पारंपरिक हिंदू पोशाखात शाळेत पाठवतील, असे महिलांनी सांगितले. यापूर्वी मुंबईत मुस्लिम महिलांनी हिजाबच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवताना हजारो बुरका घालणाऱ्या महिलांच्या सह्या घेतल्या होत्या. बीडच्या चौकाचौकात ‘पहले हिजाब मग किताब’चे पोस्टर्स लावण्यात आले. बीड शहरातील शिवाजी महाराज चौक, बशीर गंज चौक, राजुरीवेस या परिसरात हे बॅनर लावण्यात आले होते, मात्र वाद वाढल्यानंतर ते हटवण्यात आले.