लोकसभा, विधानसभा हरलेल्या वैफल्यग्रस्त माणसाकडून हे सुरू; मोहोळ यांची धंगेकरांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 15:07 IST2025-10-23T15:05:55+5:302025-10-23T15:07:16+5:30
आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करत अवघ्या २ दिवसांमध्ये कर्ज प्रकरण, तारण व जागेची खरेदी ही सगळी प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने वापरून प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर केला - रवींद्र धंगेकर

लोकसभा, विधानसभा हरलेल्या वैफल्यग्रस्त माणसाकडून हे सुरू; मोहोळ यांची धंगेकरांवर टीका
पुणे: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुण्याचे महागनगरप्रमुख रविंद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. त्यांनी पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेच्या व्यवहाराचा मुद्दा उचलून धरला आहे. या प्रकरणात पुण्याचे भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले आहेत. भगवान महावीरांचे मंदिर आणि जैन बोर्डींगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द होऊन भगवान महावीरांच्या मूर्तीवरील कर्जाचा बोजा चढविणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील असंही त्यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्याशी संबंधित व्यक्ती व संस्था यांना लाभ होईल अशा प्रकारे राज्याच्या मुख्य धर्मदाय आयुक्तांवर दबाव टाकत नियमबाह्यपणे पब्लिक ट्रस्टची प्रॉपर्टी विकण्याची तातडीने परवानगी मिळवून दिली असल्याचा आरोपही धंगेकर यांनी केला आहे.
त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मोहोळ म्हणाले, एकच माणूस आहे, त्यावर बोलायचं मी सोडून दिल आहे. मी त्या दिवशी सगळे स्पष्टीकरण दिलं आहे. या शहरातलं वातावरण बिघडणारी जी मंडळी आहेत. त्यांचे वाईट नक्की घ्या पण त्यांच्याकडचे पुरावे आधी तपासा. पुरावे घ्या आणि त्यांच्या मुलाखती करा. उठायचं आणि काहीही आरोप करायचे असं चालत नाही. हे व्यक्तिगत सुरू आहे. विधानसभा लोकसभा निवडणूक हरलेल्या वैफल्यग्रस्त माणसाकडून हे सुरू आहे. मी स्पष्टीकरण दिलं आहे पुन्हा त्याच्यावरती बोलू नये असं मला वाटतं असल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिल आहे.
धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्याबाबत बोलताना मोहोळ म्हणाले, विशाल गोखले हा माझा मित्र होता आहे आणि राहणार आहे. पाच वर्षांपूर्वी मी तो व्हिडिओ बनवला होता. जुना व्हिडिओ काढला आणि त्यात सांगितलं की मी जाहिरात करत आहे. तो कालचा व्हिडिओ नाही. या प्रकरणातील सत्यता तपासा. काल कुणीतरी एका दुकानाची ऍड करत होतं मग त्याच्यात ते पार्टनर झाले का? असा सवाल मोहोळ यांनी उपस्थित केला आहे.या शहराची राजकीय संस्कृती आहे. एक राजकीय माणूस ही राजकीय संस्कृती बिघडवत आहे.
गोखलेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे - धंगेकर
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्याशी संबंधित व्यक्ती व संस्था यांना लाभ होईल अशा प्रकारे राज्याच्या मुख्य धर्मदाय आयुक्तांवर दबाव टाकत नियमबाह्यपणे पब्लिक ट्रस्टची प्रॉपर्टी विकण्याची तातडीने परवानगी मिळवून दिली. आपल्या केंद्रीय सहकार राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत राज्यातील दोन बँकांना नियमबाह्य पद्धतीने दोन दिवसात 70 कोटी रुपयांचे कर्ज द्यायला सांगितले. आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करत अवघ्या दोन दिवसांमध्ये कर्ज प्रकरण, तारण व जागेची खरेदी ही सगळी प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने वापरून प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर केला. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे. या जागेबाबतची कागदपत्रे सादर करत असताना नकाशावरील जैन मंदिराचा उल्लेख "ओल्ड स्ट्रक्चर" असा करत धर्मदाय आयुक्त व बँक यांची फसवणूक केल्याबद्दल या मालमत्तेचे व्हॅल्युएशन करणारी संस्था मेरिट कन्सल्टन्सी व बिल्डर गोखले कन्स्ट्रक्शन यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे असं धंगेकर यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.