पीएमपीच्या प्रवाशांवर चोरट्यांचे लक्ष; बस प्रवासादरम्यान ज्येष्ठे महिलेचे मंगळसूत्र चोरले, पोलिसांचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 11:08 IST2025-09-19T11:08:33+5:302025-09-19T11:08:52+5:30
पीएमपी प्रशासनासह स्थानिक पोलिसांकडून चोरट्यांवर जरब बसवली जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे

पीएमपीच्या प्रवाशांवर चोरट्यांचे लक्ष; बस प्रवासादरम्यान ज्येष्ठे महिलेचे मंगळसूत्र चोरले, पोलिसांचे दुर्लक्ष
पुणे: शहरातील विविध भागांतून पीएमपी प्रवास करणाऱ्या महिलांना चोरट्यांच्या टोळीने लक्ष्य केले आहे. ज्येष्ठ महिलांसह गावाहून आलेल्या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडील ऐवज लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, तरीही पीएमपी प्रशासनासह स्थानिक पोलिसांकडून चोरट्यांवर जरब बसवली जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पीएमपी बस प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख ४० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले आहे. ही घटना १७ सप्टेंबर रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास आळंदी देवाची ते कुमार पॅसिफिक मॉलदरम्यान घडली आहे. याप्रकरणी मुळशी तालुक्यातील भादसमध्ये राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला मुळशी तालुक्यातील भादस गावातील रहिवासी आहे. १७ सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास त्या आळंदी देवाची ते कुमार पॅसिफिक मॉल असा पीएमपी बसने प्रवास करत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाख ४० हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. पुढील तपास पोलिस अंमलदार दुडम करत आहेत.