सलग ७२ तास सीसीटीव्ही तपासून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या 

By नारायण बडगुजर | Updated: December 23, 2024 16:58 IST2024-12-23T16:57:02+5:302024-12-23T16:58:32+5:30

सांगवी येथे महिलेला मारहाण करून सोनसाखळी चोरी केल्याचे प्रकरण

Thief caught after checking CCTV for 72 hours | सलग ७२ तास सीसीटीव्ही तपासून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या 

सलग ७२ तास सीसीटीव्ही तपासून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या 

पिंपरी : महिलेला मारहाण करून सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याच्या पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. सलग ७२ तास सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पोलिसांनी चोरट्याची ओळख पटवून त्याला अटक केली.   

ईश्वर कैलास वाल्हेकर (३४, रा. बौद्धनगर, एमआयडीसी पिंपरी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला ट्युशन घेण्यासाठी लिफ्टमधून जात असताना त्यांच्या मागून आलेल्या अनोळखी व्यक्तीने हत्याराने डोक्यात मारले. यात महिला जखमी झाली. त्यानंतर अनोळखी व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करून नेली. ही घटना १९ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट ४, मालमत्ता गुन्हे विरोधी पथक व गुंडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तीन दिवस व रात्र तपासणी केली. 

पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त (गुन्हे १) डॉ. विशाल हिरे, सहायक आयुक्त (गुन्हे २) बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ४ पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप सावंत, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक हरिश माने, उपनिरीक्षक भरत गोसावी, तसेच पोलिस अंमलदार मोहम्मद गौस नदाफ, तुषार शेटे, प्रशांत सैद, तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

दुचाकीला बनावट नंबरप्लेट

एक संशयित व्यक्ती बनावट नंबरप्लेट लावलेल्या दुचाकीवरून पळून जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. तो कोणत्या मार्गाने आला आणि पळून गेला याबाबत तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तसेच त्याने वापरलेल्या वाहनाबाबतही पोलिसांनी माहिती मिळवली. त्यावरून तो संशयित हा ईश्वर वाल्हेकर असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Web Title: Thief caught after checking CCTV for 72 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.