'त्या' शतपावली करण्यासाठी बाहेर पडल्या अन् रस्ता क्रॉस करताना अनर्थ घडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 16:01 IST2023-02-27T16:01:19+5:302023-02-27T16:01:29+5:30
मोटारसायकलची धडक बसल्याने एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

'त्या' शतपावली करण्यासाठी बाहेर पडल्या अन् रस्ता क्रॉस करताना अनर्थ घडला
पुणे : सिग्नलला रस्ता ओलांडताना मोटारसायकलची धडक बसल्याने एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. जयश्री प्रदीप करंजीकर (६४, रा. डहाणूकर कॉलनी, कोथरुड) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात कर्वे रोडवरील हॅपी कॉलनीकडून डहाणूकरकडे जाणाऱ्या सिग्नलजवळ रविवारी रात्री पावणेअकरा वाजता घडला. याप्रकरणी पोलिसांनी भावेश नंदलाल आहिरे (२८, रा. गुजरात कॉलनी, कोथरुड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची माहिती अशी, जयश्री करंजीकर या डहाणूकर कॉलनीत राहातात. रात्री जेवण झाल्यानंतर त्या शतपावली करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. कर्वे रोडवरील डहाणूकर कॉलनीकडे जाणाऱ्या सिग्नलजवळ त्या रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या मोटारसायकल चालकाने त्यांना धडक दिली. त्यात त्या जबर जखमी झाल्या. त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले असताना डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे तपास करीत आहेत.