Baramati Nagar Parishad: "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 11:07 IST2025-11-24T11:05:31+5:302025-11-24T11:07:41+5:30
बारामती नगरपालिका निवडणुकीत उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख रुपये दिल्याचा आरोप युगेंद्र पवार यांनी केला आहे.

Baramati Nagar Parishad: "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ
बारामती नगरपरिषद निवडणुकीत अजित पवार गटाने लाखो रुपये देऊन उमेदवार फोडल्याचा गंभीर आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते युगेंद्र पवार यांनी केला आहे. जे आठ उमेदवार बिनविरोध आले आहेत, त्यापैकी चार जागांवर आम्ही उमेदवार दिले होते. पण, त्यांना पैसे देऊन फोडण्यात आले. जे विधानसभेला झाले, तेच आता नगरपरिषद निवडणुकीत होत आहे, असा खळबळ उडवून देणारा दावा युगेंद्र पवारांनी केला आहे.
बारामती नगरपरिषदेची निवडणूक होत असून, आठ जागा अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. आणखी चार जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले, पण त्यात यश आले नाही, अशी स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे. नगरसेवक पदाच्या उर्वरित जागांसाठी १६५ उमेदवार मैदानात आहेत. याचदरम्यान, युगेंद्र पवार यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप केला आहे.
प्रत्येक उमेदवाराला २० लाख दिले
नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ युगेंद्र पवार यांनी केला. यावेळी त्यांनी अजित पवार गटावर पैसे देऊन उमेदवार फोडल्याचा आरोप केला. युगेंद्र पवार म्हणाले, "आपल्याविरोधात मोठी शक्ती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. त्यापैक चार ठिकाणी आमचे चार ठिकाणी उमेदवार होते. प्रत्येकी २० लाख रुपये देऊन त्यांना फोडले."
"चौघांना विरोधी गटाने २० लाख रुपये दिल्याची चर्चा लोकांमध्येही होतेय. आमचे उमेदवार सर्वसामान्य होते. पुढचे दहा वर्षे कष्ट करूनही त्यांना २० लाख रुपये कमावता येणार नाहीत. दोन उमेदवार नवीनच आले होते. ते कुठल्याच पक्षात नव्हते. आम्हाला संधी दिल्यास चांगलं काम करू म्हणाले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवला पण ते फुटले", असे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे.
विधासभेलाही हीच दहशत बघायला मिळाली होती
युगेंद्र पवार म्हणाले, "आमच्याविरोधात मोठी शक्ती आहे. त्यांच्याकडे खूप पैसा आहे. सत्ता आहे. संस्था आहेत. सगळे तिथे काम करत आहेत आणि त्यांच्यावर दबाव टाकला जात असेल, तर दोन-तीन लोक जाणं साहजिकच आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही ही दहशत बघायला मिळाली होती. आता नगरपालिकेच्या निवडणुकीतही हेच दिसत आहे", असे युगेंद्र पवार म्हणाले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कोणते उमेदवार बिनविरोध?
बारामती नगरपरिषदेच्या प्रभाग दोन अ मधून अनुप्रिता तांबे, पाच अ मधून किशोर मासाळ, सहा अ मधून धनश्री बांदल, सहा ब मधून अभिजित जाधव, आठ अ मधून श्वेता नाळे, १७ ब मधून शर्मिला ढवाण, १८ ब मधून अश्विनी सातव, २० ब मधून अफरीन बागवान हे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्या ७७ जणांनी, तर नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ पैकी आठ जागा निकालाआधीच बिनविरोध जिंकल्या आहेत.