रविवारची सुट्टी असल्याने ते मोर्चात सहभागी नाहीत; धस यांचा पुण्यातील आमदारांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 18:12 IST2025-01-05T18:12:35+5:302025-01-05T18:12:54+5:30
वाल्मिक कराड बीडमध्ये संघटीत टोळी तयार करुन गुंडगिरी करत आहे, त्याला मंत्री धनजंय मुंढे यांचा आशीर्वाद आहे

रविवारची सुट्टी असल्याने ते मोर्चात सहभागी नाहीत; धस यांचा पुण्यातील आमदारांवर निशाणा
पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, जोपर्यंत फाशीची शिक्षा होणार नाही, तोपर्यंत राज्यात विविध मोर्चे सुरु राहतील, असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी पुण्यातील आक्रोश मोर्चामध्ये दिला आहे. यावेळी पुण्यातील आमदार या जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले नाहीत. यावरून सुरेश धस यांनी पुण्यातील आमदारांवर निशाणा साधला. रविवार असल्याने पुण्यातील आमदारांना कदाचित सुट्टी असेल म्हणून ते सहभागी झाले नाहीत असा खोचक टोला त्यांनी आमदारांना लगावला आहे.
सरपंच संतोष देशमुख व बुद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी पुण्यात सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष ज्योती मेटे, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख, पत्नी अश्वीनी देशमुख, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष्राचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, विकास पासलकर आदी उपस्थित झाले होत. यावेळी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, आबालवृद्ध सहभागी झाले होते.
सुरेश धस म्हणाले, बीडमध्ये संघटित टोळी सुरु आहे. वाल्मिक कराड संघटीत टोळी तयार करुन गुंडगिरी करत आहे. त्याला मंत्री धनजंय मुंढे यांचा आशीर्वाद आहे. त्याशिवाय संतोष देशमुख यांची हत्या झालेली नाही. कुणीही असला तरी त्याला फाशीच झाली पाहिजे. ही आमची कायम मागणी आहे. ‘मला अटक करा पुण्यात...’ असे म्हणतात. परंतु आता सर्व आरोपी पुण्यातच होते. पुणे तिथं काय उणं आता काहीच उरलं नाही. कुणामुळे झाले तर या वाल्किम कराड आणि गँगमुळे. गँग्ज ऑफ परळीमुळे पुण्याचे नाव खराब होत आहे. बीडमधील या टोळींचे जिथे जिथे फ्लॅट असतील, पुणेकरांना विनंती आहे की, दिसेल तर फक्त कळवा. परंतु या लोकांना फाशीची शिक्षा द्या, तोपर्यंत समाज गप्प बसणार नाही.
ज्योती मेटे म्हणाल्या, या घटनेला जातीय रंग येतो की काय असे वाटत आहे. आरोपीला शोधण्यासाठी एवढा विलंब का लागला? प्रशासनाकडून जर दिरंगाई झाली असेल तर जाणीवपूर्वक झाली आहे का, याचे उत्तर शासनाने दिले पाहिजे. शासनाने मोर्चाची गांभीर्याने देखल घ्यावी. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी.