'एमपीएससी'कडून ४५० जागांची पदभरती, जाहिरात व्हायरल, संकेतस्थळावर अधिकृत घोषणा नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 21:31 IST2018-02-27T21:31:35+5:302018-02-27T21:31:35+5:30
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांच्या राज्यभरातील मोर्चानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलिस उप निरीक्षक पदाच्या एकुण ४४९ पदांची भरती केली जाणार आहे. या पदभरतीची जाहिरात सोशल मिडियावर व्हायरल झाली.

'एमपीएससी'कडून ४५० जागांची पदभरती, जाहिरात व्हायरल, संकेतस्थळावर अधिकृत घोषणा नाही
पुणे : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांच्या राज्यभरातील मोर्चानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलिस उप निरीक्षक पदाच्या एकुण ४४९ पदांची भरती केली जाणार आहे. या पदभरतीची जाहिरात सोशल मिडियावर व्हायरल झाली असून मंगळवारी रात्री उशिरापर्यंत आयोगाच्या संकेतस्थळावर याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, बुधवारी ही जाहिरात संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाकडून पदभरती होत नसल्याने राज्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पदभरतीसाठी राज्यात या विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी मोर्चेही काढले. त्यामुळे शासनाकडून पदभरतीसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. यापार्श्वभुमीवर मंगळवारी आयोगाच्या ४४९ पदांच्या भरतीची जाहिरात व्हायरल झाली. या जाहिरातीनुसार, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब या पदांची संयुक्त पुर्व परीक्षा दि. १३ मे रोजी घेण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागातील सहायक कक्ष अधिकारीची २८, राज्य कर निरीक्षकांची ३४ तर पोलीस उप निरीक्षकची सर्वाधिक ३८७ पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी विद्यार्थ्यांना दि. २८ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत अर्ज करता येईल.
दरम्यान, ही जाहिरात आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत प्रसिध्द करण्यात आलेली नव्हती. या जाहिरातीवर प्रसिध्दीचा दिनांक २८ फेब्रवारी आहे. त्यामुळे बुधवारी ही जाहिरात संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाऊ शकते. याबाबत आयोगातील अधिकाºयांशी संपर्क साधला असता व्हायरल झालेल्या जाहिरातीला त्यांनी दुजोरा दिला. जाहिरात वृतपत्रामध्ये प्रसिध्दीसाठी आधी द्यावी लागते. तीच सोशल मिडियावर व्हायरल झाल्याचे दिसते. मात्र, आयोगाच्या संकेतस्थळावर जी जाहिरात प्रसिध्द होईल, तीच अधिकृत असेल, असेही संबंधित अधिका-याने सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांचा मुंबईत आझाद मैदानावर दि. १ मार्च रोजी मोर्चा आहे. या मोर्चाच्या एक दिवस आधीच आयोगाची जाहिरात व्हायरल झाली आहे. विद्यार्थ्यांनी ही जाहिरात म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. किमान एक हजार पदांची जाहिरात निघणे अपेक्षित होते. पण निम्म्याही पदे जाहिरातीत दिसत नाहीत. जाहिरात निघाल्यानंतर मोर्चाला प्रतिसाद मिळू नये, असा शासनाचा प्रयत्न दिसतो, असे दावा समन्वय समितीच्या किरण निंभोरे याने केला. केवळ ४४९ पदांनी विद्यार्थ्यांचे समाधान होणार नाही. आझाद मैदानावरील मोर्चा होणारच असून राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहतील, असेही त्याने स्पष्ट केले.