वकिली करताना त्यात यशस्वी होण्याचे अचूक असे कुठले सूत्र नाही : कपिल सिब्बल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 19:31 IST2020-01-11T19:20:50+5:302020-01-11T19:31:23+5:30
यशस्वी वकिल होण्याचे मुळ हे वकीलाच्या आकलन आणि समजुतदारपणा यात आहे...

वकिली करताना त्यात यशस्वी होण्याचे अचूक असे कुठले सूत्र नाही : कपिल सिब्बल
पुणे : वकिली करताना त्यात यशस्वी होण्याचे अचूक असे कुठले सुत्र नाही. आपला युक्तिवाद न्यायालयाला प्रभावीपणे पटवून देणे यासाठी वकिलाला मानवी भावनाचे विविध पैलु समजावून घेता यायला हवेत. तसे झाल्यास तो आपल्या पक्षकाराची बाजु तितक्याच संवेदनशीलतेने मांडु शकतो. यशस्वी वकिल होण्याचे मुळ हे वकीलाच्या आकलन आणि समजुतदारपणा यात आहे. याचा अभ्यास व्हायला हवा. असे मत ज्येष्ठ विधिज्ञ व खासदार कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज येथे शनिवारी डॉ. पतंगराव कदम स्मृती व्याख्यानमालेत प्रसिद्ध वकील व राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल हे ‘वकिली कौशल्य ( अॅडव्होकसी स्किल्स’ या विषयावर बोलत होते. यावेळी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. भाग्यश्री देशपांडे, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते. सिब्बल म्हणाले, आपल्या पक्षकाराची न्यायालयात बाजू मांडण्यासाठी जाताना दाव्यांचा बारकाईने अभ्यास करून नेमका वाद काय आहे, हे मांडता आले पाहिजे. कायदेशीर बाजू मांडताना आपण स्वत: आपल्या मुद्द्यांवर ठाम आहोत का हे पाहिले पाहिजे. वकिलीचे क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जिथे सर्व कायदा या मुद्द्यामुळे समान असतात. कोणीही पदाने, वयाने लहान किंवा मोठा नसतो, त्यामुळे वकिली करताना कोणतीही भिती बाळगू नये. असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच वकिलीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणतेही सूत्र ठरलेले नाही. जसे स्वयंपाक घरात पाककृती करण्यासाठी कोणता पदार्थ किती व कसा वापरायचा याचे पक्के सूत्र ठरलेले नाही, तसे वकिली क्षेत्रालाही हे लागू होते. मात्र वकिली करताना वकिलांना कायदा नेमका काय आहे, त्याची निर्मिती, तो तयार करण्यामागे कोणत्या भावना होत्या हे समजून घेणे आवश्यक आहे. कायदा तोच असला तरी प्रत्येक दाव्यात त्याचे संदर्भ देताना गुन्ह्यामागील मानवी भावना नेमकी काय होते हे वकिलाला मांडता आले पाहिजे, असे सिब्बल यांनी सांगितले.