मंत्रिपद न मिळाल्यामुळे रिपब्लिकन पक्षामध्ये काही प्रमाणात अस्वस्थता; आठवलेंनी व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 13:58 IST2025-03-10T13:57:43+5:302025-03-10T13:58:31+5:30
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला जागा मिळणे आवश्यक आहे

मंत्रिपद न मिळाल्यामुळे रिपब्लिकन पक्षामध्ये काही प्रमाणात अस्वस्थता; आठवलेंनी व्यक्त केली नाराजी
पुणे : रिपब्लिकन पक्षामध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे काही प्रमाणात अस्वस्थता आहे. मात्र, महायुतीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून येण्यामध्ये रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी जनतेचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला जागा मिळणे आवश्यक आहे. विशेषत: पुण्यासारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी जनता वास्तव्य करीत आहे. त्यामुळे पुण्याचे महापौरपद आरक्षित झाल्यास ते रिपब्लिकन पक्षाला मिळावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
पुणे दौऱ्यावर आल्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ‘रिपाइं’चे प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनवणे, रोहिदास गायकवाड, अशोक कांबळे, शैलेंद्र चव्हाण, महेंद्र कांबळे, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, वीरेन साठे, पदाधिकारी उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता आली. त्यामुळे सध्याच्या सरकारने दिलेले आश्वासन पाळावे व ते पूर्ण करावे, असे मतही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
पुण्यात भव्य आंबेडकर स्मारक उभारले जावे
पुणे रेल्वे स्थानकाजवळ आंबेडकर भवनच्या मागे दोन एकरचा भूखंड रिकामा आहे. या जागेवर भव्य आंबेडकर स्मारक उभारले जावे, अशी आपली मागणी आहे. त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. ही जागा कर्करोग रुग्णालयासाठी मागितली. जात असली तरीदेखील रुग्णालयासाठी इतर जागा निवडण्यात यावी. आपला विरोध रुग्णालयाच्या उभारणीला नाही. रुग्णालय उभारणे गरजेचे आहे. मात्र, आंबेडकर भवन नजीकच्या जागेवर आंबेडकर स्मारक उभारले जावे, असा आपला आग्रह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.