पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांच्या अडचणी वाढल्या आहेत. शंतनू कुकडे प्रकरणात दीपक मानकरांनी बनावट कागदपत्र सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये सहभागी आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. अशातच पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर गुन्हा दाखल झाल्यानं पुणे शहराच्या राजकारणात मोठी चर्चा होऊ लागली आहे. यावरून आमच्यावर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही, कायद्यानुसार कारवाई होणार असल्याचे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी सांगितले आहे.
गिल म्हणाले, समर्थ पोलीस ठाण्यात शंतनू कुकडे विरोधातील एका गुन्ह्याचा तपास सुरू होता. तपासा दरम्यान त्याच्या रेड हाऊस संस्थेच्या व कुकडेच्या अकाउंटवर आर्थिक देवाण घेवाण झाली होती. त्याच तपासातून दीपक मानकर यांना काही कागदपत्र सादर करायला सांगितली होती. मानकरी यांनी त्यात एक बनावट कागदपत्र सादर केलं. रौनक जैन आणि दीपक मानकर यांच्याकडून बनावट कागदपत्र सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंतनू कुकडे, दीपक मानकर, रौनक जैन यांच्यासह काही जणांवर गुन्हे दाखल आहेत. हा गुन्हा जामीन पात्र नाही. गुन्ह्यात कोणाचा किती सहभाग याची चौकशी सुरू असून पुढील तपास सुरू आहे. आमच्यावर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही. त्यामुळे कायद्यानुसार कारवाई सुरू राहणार आहे. सदर गुन्ह्यात दीपक मानकर यांची दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. एक कोटी 18 लाख रुपयांची आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
दीपक मानकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले
जैन याच्या बँक खात्यातून आमच्या बँक खात्यात पैसे आले. आमचा एका जमिनीचा व्यवहार आहे. तो याच्यासोबत झाला. आणि त्याची कायदेशीर इसार पावती देखील आहे. शंतनू कुकडे याचे वैयक्तिक जीवन आणि त्याचे आर्थिक व्यवहार याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. असं दीपक मानकर यांनी त्यावेळी म्हटलं होतं. दरम्यान आता याच प्रकरणामध्ये दीपक मानकर यांनी पोलिसांना जी कागदपत्र सादर केली आहेत. तीच बनावट असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.