महिला सुरक्षा रक्षकांसाठी निधीच नाही; मुलींच्या सुरक्षेबाबत पुणे महापालिकेची उदासीनता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 15:59 IST2025-03-03T15:58:48+5:302025-03-03T15:59:23+5:30
पीएमपीएमएल बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी महापालिकेकडे निधीच उपलब्ध नसल्याचे महापालिकेनेच पत्राद्वारे पीएमपीएमएलला कळविले

महिला सुरक्षा रक्षकांसाठी निधीच नाही; मुलींच्या सुरक्षेबाबत पुणे महापालिकेची उदासीनता
पुणे: शहरातील विविध शाळांसाठी दिलेल्या पीएमपीएमएल बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी महापालिकेकडे निधीच उपलब्ध नसल्याचे महापालिकेनेच पत्राद्वारे पीएमपीएमएलला कळविले आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेबाबत महापालिका उदासीन असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारीत शहरात सुमारे २८० शाळा आहेत. या शाळांमध्ये विद्यानिकेतन आणि क्रीडानिकेतन शाळांमध्ये प्रवेश असलेल्या मुलींसाठी शिक्षण विभागाकडून पीएमपीएमएल बस उपलब्ध करून दिल्या जातात. या बस मोफत असतात, आणि त्याचा खर्च महापालिकेकडून केला जातो. बदलापूर येथील शालेय प्रकरणानंतर राज्याच्या परिवहन विभागाने प्रत्येक शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये महिला मदतनीस ठेवणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार, पीएमपीएमएल प्रशासनाने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्याचे पत्र महापालिकेच्या शिक्षण विभागास दिले होते.
त्यानंतर शिक्षण विभागाने सुरक्षा विभागास महिला सुरक्षा नेमण्यासंदर्भात कळविले होते. मात्र, सुरक्षा विभागाने निधीअभावी शक्य नसल्याचे कळविले आहे. शहरात अनावश्यक कामांसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणारे महापालिका प्रशासन, केवळ तीन महिन्यांसाठी ५० महिला सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी निधी नसल्याचे कारण पुढे करत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत महापालिका प्रशासनाची असलेली उदासीनता पुन्हा एकदा समोर आली आहे.
आता स्वारगेट येथील घटनेमुळे पुन्हा महिला व मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पीएमपीएमएल बसमध्ये ३०० महिला सुरक्षा रक्षक नेमण्याचे जाहीर केले आहे. यासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात स्वतंत्र तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.