राज्यात करमणुक करच नाही, २०१७ सालीच हा कर नेहमीसाठी रद्द केलाय - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:08 IST2025-02-19T16:01:00+5:302025-02-19T16:08:24+5:30
छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला अधिक काय करता येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करु

राज्यात करमणुक करच नाही, २०१७ सालीच हा कर नेहमीसाठी रद्द केलाय - देवेंद्र फडणवीस
पुणे : देशातील अन्य राज्य जेव्हा चित्रपट टॅक्स फ्री करतात तेव्हा जो करमणूक कर असतो तो माफ केला जातो. महाराष्टाने २०१७ सालीच निर्णय घेउन करमणूक कर हा नेहमीसाठी रद्द केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात करमणूक कर नाही. त्यामुळे छावा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला अधिक काय करता येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करु असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या होस्टेल मैदानावर जय शिवाजी-जय भारत पदयात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यानंतर ते पत्रकाराशी बोलत होते. छावा चित्रपट करमुक्त करण्याच्या मुद्द्यावर बोलताना देंवेद्र फडणवीस म्हणाले , “मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे की, हा सिनेमा टॅक्स फ्री करा. पण मी महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की, इतर राज्य जेव्हा चित्रपट टॅक्स फ्री करतात तेव्हा जो करमणूक कर असतो तो माफ केला जातो. महाराष्टाने २०१७ सालीच निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात करमणूक कर हा नेहमीकरिता रद्द केला आहे. आपल्याकडे (महाराष्ट्रात) करमणूक कर नाही. त्यामुळे अशी माफी देण्यासाठी असा करच आपल्याकडे नाही. “मला एका गोष्टीचा आनंद आहे की, छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं शौर्य, विरता आणि विद्वत्ता प्रचंड होती, पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला. ज्यांच्याबद्दल ‘देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था’, असं म्हटलं गेलं त्यांच्यावर अतिशय चांगला, इतिहासाशी कुठलीही प्रतारणा न करता ऐतिहासिक असा सिनेमा तयार झाला आहे. त्याबद्दल सिनेमाचे निर्माते, निर्देशक आणि प्रमुख भूमिका करणारे विकी कौशल यांचे मानापासून अभिनंदन करतो असेही फडणवीस यांनी सांगितले.
अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणार्या अभिनेत्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, संभाजी महाराजांना अपमानित करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू, असे कोणी वागत असेल तर त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवू आणि शिवप्रेमी त्यांना जागा दाखवतील. छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भात निर्माण होणारा वाद राजकीय किनार असणारा आहे. तथापि यासंदर्भात अनेक समित्या केल्या गेल्या आहेत. त्याच्यावर सरकारने निर्णयसुद्धा घेतले आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शिवरायांचे मावळे म्हणूनच आम्ही राज्यकारभार करत आहोत
“केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती होते म्हणून आम्ही आहोत. छत्रपतींनी आम्हाला आत्माभिमान दिला, आत्मतेज दिलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला समतेचा संदेश दिला. १८ पगड जातींना एकत्रित करून ज्या स्वराज्याची त्यांनी स्थापना केली त्या स्वराज्यातून एकतेचा संदेश त्यांनी आम्हाला दिला. राज्यकारभार कसा चालवला पाहिजे हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला शिकवलं. वनसंवर्धन, जलसंवर्धन कसं केलं पाहिजे हे शिवरायांनी शिकवलं. करप्रणाली कशी असली पाहिजे, सुरक्षा, समुद्री सुरक्षा कशी ठेवली पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं”“या सर्व आज्ञावलींचे पालन करत असताना पहिल्यांदा मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिला. फारसी भाषेचे शब्द वगळून सगळ्या आज्ञावली मराठी भाषेत करण्याचे काम महाराजांनी आम्हाला दिलं, शिवरायांचे मावळे म्हणूनच आम्ही राज्यकारभार आम्ही करत आहोत,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत नाही. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अजित पवार आणि एकनाथ शिंदे माझ्यासोबत पुण्यात आले. परंतु त्यांचे वेगळे कार्यक्रम असल्यामुळे ते निघून गेले.