घुबडांविषयी अंधश्रद्धाच फार; तो तर आपला मित्र, त्यासाठी मोठी झाडे जपा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 03:48 PM2022-11-27T15:48:03+5:302022-11-27T15:48:13+5:30

घुबड या नावावरून समाजात अनेक गैरसमज असून खरंतर घुबड हा मानवासह शेतकऱ्याचा मित्र

There are many superstitions about owls He is your friend save big trees for that! | घुबडांविषयी अंधश्रद्धाच फार; तो तर आपला मित्र, त्यासाठी मोठी झाडे जपा!

घुबडांविषयी अंधश्रद्धाच फार; तो तर आपला मित्र, त्यासाठी मोठी झाडे जपा!

googlenewsNext

पुणे : घुबड या नावावरून समाजात अनेक गैरसमज आहेत. खरंतर घुबड हा मानवासह शेतकऱ्याचा मित्र आहे. घुबडांबद्दल समाजात मोठ्या अंधश्रद्धा, चुकीचे समज आहेत. हाच गैरसमज दूर करण्यासाठी उलूक उत्सवाचे आयोजन केले आहे, असे महोत्सवाचे संयोजक, ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ, इला फांउडेशनचे संस्थापक डॉ. सतीश पांडे यांनी सांगितले. या महोत्सवानिमित्त ‘लाेकमत’चे श्रीकिशन काळे यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद.

उलूक उत्सव कशासाठी?

देशात दरवर्षी ७८ हजार घुबडांची हत्या होत आहे. हे थांबविणे आवश्यक असून, जनजागृती करणे हाच यावरचा उपाय आहे. त्यासाठी ही परिषद महत्त्वाची आहे. शेताची नासधूस करणारे उंदीर, घूस इतर प्राण्यांना ताे खातो. त्यामुळे हा खरा शेतकरी मित्र आहे; परंतु, काही अंधश्रद्धांमुळे लोक घुबडाकडे दुर्लक्ष करतात. भारतात सुमारे ३५ प्रकारची घुबडे वास्तव्यास आहेत. यातील पन्नास टक्के घुबड महाराष्ट्रात आढळतात. त्यामुळे त्यांच्यावर अजून संशोधन व्हायला हवे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही घुबडांच्या तस्करांचे जाळे पसरलेले आहे. औषधांसाठी त्याचा वापर करण्याकरिता घुबडांची हत्या केली जाते, हे थांबविणे गरजेचे आहे. ढोली असलेली मोठी झाडे तोडली जात आहेत. त्यामुळेदेखील घुबडांचे अधिवास धोक्यात आला आहे. हे थांबविण्यासाठी महाेत्सव आवश्यक आहे.

उत्सवाचे नेमके स्वरूप कसे असेल?

भारतात घुबडांच्या एकूण ४२ प्रजाती आढळत असून, त्याची संपूर्ण माहिती सर्वांना व्हावी. तसेच या पक्ष्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आस्था निर्माण व्हावी, यासाठी उलूक उत्सव इला फांउडेशनतर्फे भारतीय स्तरावर साजरा केला जाताे. यंदाचा हा तिसरा उलूक महोत्सव आहे. घुबड- नाणी, पोस्टाची तिकिटे, विविध वस्तू, फ्रिजवरील घुबड, घुबडांची छायाचित्रे यांचे प्रदर्शन, लघुपट व माहितीपट अशा विविध माध्यमातून घुबडांची जीवनप्रणाली स्पष्ट केली जाणार आहे. या उलूक उत्सवात शाळा, महाविद्यालय आणि विविध निसर्गप्रेमी संस्था सहभागी हाेऊ शकतील. गेल्या दोन महोत्सवामध्ये अनेक शाळांनी भेटी दिल्या होत्या.

कधी आणि कुठे असेल उत्सव?

 पुरंदर तालुक्यातील पिंगाेरी येथे दि. १ व २ डिसेंबर राेजी हा उत्सव असणार आहे. या उत्सवामध्ये घुबडांची शास्त्रीय माहिती, सांस्कृतिक वारसा व महत्त्व समजण्यासाठी घुबडांच्या विविध कलाकृती, चित्रे, गायन, वादन, नाटिका, नृत्य, वक्तृत्व, पोवाडा, रांगोळी, मेंदी काम, फेस पेंटिंग व लेख अशा अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे. यात आतापर्यंत दाेन हजार विद्यार्थ्यांनी चित्रे काढून पाठविली आहेत.

Web Title: There are many superstitions about owls He is your friend save big trees for that!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.