'पुण्यात रस्त्यांना खड्डे खूप पडले आहेत, रस्ते चांगले करा', थेट मुख्यमंत्र्यांकडूनच शहरातील खड्ड्यांची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:04 IST2025-09-23T17:03:09+5:302025-09-23T17:04:14+5:30
पुणे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या या खड्ड्यांमुळे वाहनाचालकांचे कंबरडे मोडण्याची वेळी आली आहे

'पुण्यात रस्त्यांना खड्डे खूप पडले आहेत, रस्ते चांगले करा', थेट मुख्यमंत्र्यांकडूनच शहरातील खड्ड्यांची तक्रार
पुणे : शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जातात. महापालिकेच्या पथ विभागाकडून काही तक्रारींचे निराकरण केले जाते, तर काही तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार केली आहे. त्यांनी ‘पुण्यातील रस्त्यांना खड्डे खूप पडले आहेत, रस्ते चांगले करा’ अशी सूचना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या तक्रारीमुळे पथविभागाचे धाबे दणाणले आहे.
महापालिका प्रशासनाकडून पावसाळापूर्व विविध कामे केली जातात. यामध्ये शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त केले जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेच्या पथ विभागाने रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च केला. शहरातील जे रस्ते आदर्श केल्याचा दावा पथविभागाने केला आहे. त्याच रस्त्यांवर मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खड्डे पडले आहेत. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या या खड्ड्यांमुळे वाहनाचालकांचे कंबरडे मोडण्याची वेळी आली आहे. ज्या ठिकाणचे खड्डे बुजविले पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडल्याचेही चित्र आहे.
नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी ‘रोज मित्र ॲप’ उपलब्ध केले आहे. त्यातून आत्तापर्यंत शेकडो खड्डे बुजविल्याचा दावा पथ विभागाने केला. मात्र, ज्या ठिकाणची तक्रार आली तेथीलच खड्डे बुजविले जात आहेत. अन्य ठिकाणी खड्डे दिसले तरी ते बुजविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच पावसाळ्यात खडी भिजल्याने महापालिकेचा येरवड्यातील हॉटमिक्स प्लांट बंद ठेवावा लागत असल्याने खड्डे बुजविण्यासाठी माल उपलब्ध नसल्याचे कारण प्रशासनाकडून दिले जाते. त्याचा फटकाही नागरिकांना बसत आहे.
गेल्या आठवड्यात फडणवीस हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांना रस्त्यातील खड्ड्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी खराब रस्त्यांची थेट आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार करून या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. थेट मुख्यमंत्र्यांनीच शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेवर बोट ठेवले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी तक्रार केलेला रस्ता हा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी पथ विभागाच्या अधिकाऱ्यांचे, अभियंत्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी तक्रार केली असल्याच्या वृत्तास आयुक्तांनी दुजोरा दिला आहे.