...तर मी भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार; शिवतारेंच्या वक्तव्याने बारामतीत नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 14:51 IST2024-03-22T14:50:34+5:302024-03-22T14:51:54+5:30
Vijay Shivtare Vs Ajit Pawar: विजय शिवतारे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अजित पवार यांची चांगलीच अडचण झाली असून आगामी काळात महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

...तर मी भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार; शिवतारेंच्या वक्तव्याने बारामतीत नवा ट्विस्ट
Shivsena Vijay Shivtare ( Marathi News ) :बारामती लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे या मैदानात उतरलेल्या असताना महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हेदेखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. शिवतारे यांच्या आक्रमक भूमिकेने महायुतीत वादाची ठिणगी पडली असून त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज विजय शिवतारे यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं असून इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारे हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेला घ्यावा किंवा वेळ पडली तर मी भाजपच्या चिन्हावर लढण्यासही तयार असल्याचं शिवतारेंनी जाहीर केलं आहे.
शरद पवार यांच्या नेतृ्त्वाला आव्हान देत मागील वर्षी अजित पवार हे आपल्या समर्थकांसह महायुतीत सामील झाले. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचं गणितही बदललं असून अजित पवारांकडून बहीण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात थेट पत्नीला मैदानात उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांचे पारंपरिक विरोधक विजय शिवतारे यांनीही बंड पुकारत अजित पवारांविषयी जनतेच्या मनात रोष असून ते कोणत्याही स्थितीत इथून निवडून येऊ शकत नाहीत, त्यामुळे महायुतीकडून मला तिकीट दिलं जावं अशी भूमिका घेतली आहे.
विजय शिवतारे यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे की, "अजित पवार यांच्या पत्नीला उमदेवारी देण्याच्या चर्चेमुळे महायुतीची एक जागा धोक्यात आली आहे. कारण अजित पवार यांची पत्नी कोणत्याही परिस्थिती निवडून येऊ शकत नाही. मतदारसंघात पवारांविषयी प्रचंड रोष आहे. त्यामुळे या मतदारसंघातील पवारविरोधी मतदाराला मतदानाची संधी देण्यासाठी मी ही निवडून लढवत आहे. मी आता माघार घेणार नाही. मला काही काळ पक्षापासून दूर व्हावं लागलं तरी चालेल, मी अपक्ष म्हणून निवडून लढायला तयार आहे. मात्र महायुतीत वेगळं वातावरण तयार होईल. त्यापेक्षा ही जागा शिवसेनेकडे घ्यावी आणि मला तिकीट द्यावं, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे. कारण जागा निवडून यावी, यासाठी महायुतीत अनेक मतदारसंघांमध्ये अदलाबदल करण्यात आली आहे. काही शिवसेनेच्या जागा भाजपने घेतल्या आहेत, काही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार राष्ट्रवादीतून निवडणूक लढवत आहेत, तर मग हा मतदारसंघ शिवसेनेकडे का घेऊ नये? मला तर भाजपच्याही कमळ चिन्हावर लढायला हरकत नाही," अशा शब्दांत शिवतारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, विजय शिवतारे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अजित पवार यांची चांगलीच अडचण झाली असून आगामी काळात महायुतीचे नेते विजय शिवतारे यांचं बंड थंड करण्यात यशस्वी होतात की शिवतारे पूर्ण ताकदीने बारामती लोकसभा निवडणूक लढतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.